गोंदियाचा डंका! NEET (UG) मध्ये ओजस रहांगडाले जिल्ह्यात प्रथम; भाजयुमोकडून गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव
७२० पैकी ६३४ गुण मिळवत पटकावला अव्वल क्रमांक; यशाचे श्रेय कुटुंब व शिक्षकांना
गोंदिया (२६ जुलै) : राष्ट्रीय पात्रता संयुक्त प्रवेश परीक्षेत (NEET-UG) गोंदिया जिल्ह्याचा गुणवंत व प्रतिभाशाली विद्यार्थी ओजस ललित रहांगडाले याने दैदिप्यमान यश संपादन करत जिल्ह्याची मान उंचावली आहे. ओजसने ७२० पैकी तब्बल ६३४ गुण मिळवून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), गोंदिया जिल्ह्याच्या वतीने त्याचा विशेष सन्मान करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या या यशाबाबत बोलताना ओजस रहांगडाले याने यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक, ‘सिद्धि विनायक कोचिंग सेंटर’चे मार्गदर्शन आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना दिले. परीक्षेशी संबंधित विषयावर बोलताना तो म्हणाला की, “पेपर लीक प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ दोषींवर कठोर कारवाई केली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे.”
या सत्कार प्रसंगी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी ओजसच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, ओजसचे हे यश जिल्ह्यातील हजारो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. भविष्यात तो एक उच्चविद्याविभूषित आणि संवेदनशील डॉक्टर बनून समाजाची सेवा करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास भाजयुमोचे रोहित अग्रवाल, आशिष ठकराणी, अभय मानकर, डॉ. पारधी, संदीप श्रीवास, यशराज बाहेकर, विनोद चांदवानी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी ओजसचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


