शेतीच्या वादातून रक्ताची नाती कलंकित; सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या!
वडिलांच्या वाटणीच्या जमिनीवरून परस्तोला शेतशिवारात थरार; आरोपी भाऊ पोलिसांच्या ताब्यात
केशोरी पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : वडिलांच्या वाटणीच्या शेतजमिनीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान सख्ख्या भावाच्या खुनात झाल्याची थरारक आणि धक्कादायक घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परस्तोला येथे बुधवारी सकाळी घडली. कुऱ्हाडीने पायांवर सपासप वार करून भावानेच भावाचा काटा काढला. मोहन मंगरू कवडो (वय ४७, रा. परस्तोला) असे मृत भावाचे नाव आहे. याप्रकरणी केशोरी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी भाऊ नारायण मंगरू कवडो (वय ४४) याला बेड्या ठोकल्या आहेत.
वडिलांचा सांभाळ ठरला वादाचे कारण!
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मोहन आणि आरोपी नारायण हे सख्खे भाऊ आहेत. वडिलांनी दोघांनाही शेतीची वेगवेगळी वाटणी करून दिली होती. मात्र, वडिलांचा संपूर्ण सांभाळ मोठा भाऊ मोहन कवडो करत असल्याने, वडिलांच्या हिस्स्यातील चार बांद्यांवर (शेतजमीन) मोहनच पेरणी व मशागत करत होते. याच गोष्टीचा राग लहान भाऊ नारायण याच्या मनात होता.
शेतशिवारात रक्ताचा सडा
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मोहन कवडो हे आपल्या पत्नीसह परस्तोला शेतशिवारात गेले होते. यावेळी आरोपी नारायण तिथे पोहोचला आणि त्याने वडिलांच्या हिस्स्यातील जमीन स्वतःला देण्याची मागणी केली. यावरून दोन्ही भावांमध्ये आधी शाब्दिक चकमक उडाली. वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात नारायणने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने मोहन यांच्या दोन्ही पायांवर भीषण वार केले. हा हल्ला इतका गंभीर होता की, अतिरक्तस्रावामुळे मोहन यांचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यांदेखत घडलेल्या या थराराने मृतकाची पत्नी प्रचंड हादरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच केशोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतकाची पत्नी कविता मोहन कवडो (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केशोरी पोलीस ठाण्यात अप.क्र. १०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची गांभीर्य लक्षात घेता आरोपी नारायण कवडो याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

