धान खरेदीची मर्यादा तातडीने वाढवा; आमदार राजकुमार बडोले यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आग्रही मागणी!
खरेदी मर्यादेमुळे अर्जुनी-मोरगाव परिसरातील शेतकरी अडचणीत
मुंबई/अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत होणाऱ्या धान खरेदीची मर्यादा तत्काळ वाढवण्यात यावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री तथा स्थानिक आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधले.तुकड्या-तुकड्यांतील मर्यादेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी:आमदार बडोले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील बहुतांश आदिवासी व सर्वसामान्य शेतकरी आपले धान पिकाचे उत्पादन आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर विकतात. मात्र, सध्या प्रशासनाकडून धान खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी किंवा प्रतिशेतकरी मर्यादा अत्यंत तोकडी आहे. या मर्यादेमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण पिकाची शासकीय केंद्रावर विक्री करता येत नाही. परिणामी, उरलेले धान व्यापाऱ्यांना कमी दराने (दलालांना) विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.एकही पात्र शेतकरी हमीभावापासून वंचित राहू नये:धान उत्पादक आदिवासी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने धान खरेदीची मर्यादा तातडीने वाढवणे गरजेचे आहे. खरेदी प्रक्रियेत कोणत्याही पात्र शेतकऱ्याला या निकषांचा फटका बसू नये आणि तो विक्रीपासून वंचित राहू नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करून तत्काळ आदेश जारी करावेत, अशी विनंतीही आमदार बडोले यांनी पत्राद्वारे केली.या भेटीदरम्यान आमदार बडोले यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर मतदारसंघातील धान उत्पादकांच्या इतरही विविध समस्या मांडल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या पिकाला योग्य शासकीय हमीभाव मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने या मागणीवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

