आरपीएफचा ‘ऑपरेशन नार्कोस’ला मोठा यश: ३४ लाखांचा गांजा जप्त, ४ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
गोंदिया : नफाखोरीच्या हव्यासापोटी तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या तस्करांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) कंबर कसली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपुर मंडळाने राबवलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत दोन वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांवर धाड टाकून तब्बल ३४ लाख २ हजार ७०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एकूण ४ तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून महागडे मोबाईल संचही हस्तगत करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई: सालेकसा ते गोंदिया दरम्यान ८ मे २०२६ रोजी, भुवनेश्वर-एलटीटी एक्सप्रेस (गाडी क्र. १२८८०) मध्ये आरपीएफच्या विशेष पथकाने तपासणी केली. सालेकसा ते गोंदिया दरम्यान जनरल कोचमध्ये संशयास्पदरीत्या प्रवास करणाऱ्या रॉकी कुमार (रा. बिहार) आणि सनातन भोई (रा. ओडिसा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगची झडती घेतली असता १६.३७४ किलो गांजा आढळला, ज्याची किंमत ८ लाख १८ हजार ७०० रुपये आहे. या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जीआरपी गोंदियाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दुसरी कारवाई: ‘सिकंदर’ श्वानाच्या मदतीने तस्करांचा पर्दाफाश
९ मे २०२६ रोजी दुसरी मोठी कारवाई पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस (गाडी क्र. १२८४३) मध्ये करण्यात आली. गोंदिया ते नागपूर दरम्यान एसी कोच (A-1) मध्ये प्रवास करणाऱ्या श्रीहर्ष मोहंती (रा. गुजरात) आणि सिपुन गौडा (रा. ओडिसा) यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. नागपूर स्थानकावर गाडी पोहोचताच जीआरपीच्या ‘सिकंदर’ नावाच्या एनडीपीएस श्वानाच्या मदतीने तपासणी केली असता, त्यांच्या बॅगेत गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ५२.०४ किलो गांजा (किंमत २६ लाख २ हजार रुपये) आणि आयफोनसह ३ मोबाईल जप्त करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई नागपूर मंडळाचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफच्या विशेष टास्क टीमने केली आहे. रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

