भन्नाट! मांजराचे पिल्लू समजून घरी आणले बिबट्याचे दोन छावे
गोंदियातील सोनेगाव येथील धक्कादायक घटना
वनविभागाने आईशी पुनर्भेट घडवण्यासाठी आखली विशेष मोहीम
गोंदिया : शेतात काम करत असताना सापडलेल्या दोन लहान पिल्लांना मांजराचे पिल्लू समजून थेट घरी घेऊन येणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. दिसायला गोंडस असलेल्या त्या पिल्लांची तपासणी केली असता, ते मांजराचे नसून बिबट्याचे छावे असल्याचे निष्पन्न झाले! ही अजब अन् अनोखी घटना गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव/बीबी टोला परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगाव क्षेत्रातील एका शेतकऱ्याला आपल्या शेतात काम करत असताना दोन चिमुकली पिल्ले दिसून आली. दिसायला अगदी लहान असल्याने शेतकऱ्याने त्यांना मांजराचे पिल्लू समजले आणि प्रेमाने घरी घेऊन आला. मात्र, काही वेळाने गावातील नागरिकांनी या पिल्लांचा रंग आणि शरीररचना पाहिली असता त्यांना संशय आला. त्यांनी लागलीच याची माहिती वनविभागाला दिली.
घटनेची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन अधिकाऱ्यांनी दोन्ही पिल्लांची सखोल पाहणी केली असता, ते बिबट्याचे छावे (एक मादी व एक नर) असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने तात्काळ दोन्ही छाव्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

पुनर्भेट घडवण्यासाठी वनविभागाची मोहीम:
मादी बिबट शिकारीच्या शोधात जाताना आपल्या लहान छाव्यांना शेतात लपवून ठेवते. त्यामुळे या छाव्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यासाठी वनविभागाने त्यांना परत त्याच शेतात सुरक्षित ठेवले आहे. मादी बिबट रात्रीच्या वेळी येऊन त्यांना घेऊन जाण्याची शक्यता आहे. दोन्ही छावे सुदृढ असून त्यांच्या सुरक्षेसाठी परिसरात कॅमेरे बसवून वनविभाग विशेष पाळत ठेवत आहे.
वनविभागाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
“जंगलात किंवा शेतात वन्यजीवांचे छावे दिसून आल्यास त्यांना अजिबात स्पर्श करू नये किंवा घरी घेऊन जाऊ नये. मानवाचा वास किंवा स्पर्श झाल्यास अनेकदा मादी बिबट आपल्या छाव्यांना स्वीकारत नाही. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

