LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदिया नगर परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी! वीज अन् कचऱ्याच्या समस्येवर नगरसेवकांचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल

मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करण्याची मुख्याधिकाऱ्यांची सभेत ग्वाही
‘जय अंबे’ संस्थेच्या ढिसाळ कारभारावर उठले प्रश्न; चौकशीचे उपाध्यक्ष पाटले यांचे आश्वासन
स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने मुलींची शाळा व योग भवन उभारण्याच्या प्रस्तावांना मंजुरी
गोंदिया (विशेष प्रतिनिधी):
गोंदिया नगर परिषदेची दुसरी सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत तब्बल ४३ विषयांवर जोरदार चर्चा झाली. आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, बांधकाम आणि वीजपुरवठा यांसारख्या थेट जनतेशी निगडित मुद्द्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पावसाळ्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग यावरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला.
नगरसेवक अभय अग्रवाल आणि राज शुक्ला यांनी शहरातील मोकाट श्‍वानांच्या वाढत्या उपद्रवाचा आणि नागरिकांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांचा मुद्दा अत्यंत तीव्रतेने उपस्थित केला. श्‍वानांची नसबंदी व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यावर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी सर्व सदस्यांच्या मागणीची दखल घेत मोकाट श्‍वानांचा तातडीने बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही दिली. कचरा संकलनात अनियमितता; ‘जय अंबे’ संस्थेची होणार चौकशी! बसपा नगरसेविका स्नेहा गडपायले यांनी शहरातील सफाई आणि घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटींकडे लक्ष वेधले. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या ‘जय अंबे’ या संस्थेचा करार संपल्यानंतरही त्यांच्याकडूनच काम कसे करून घेतले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संस्थेकडून नियमित कचरा उचलला जात नसल्याने शहरात दुर्गंधी पसरली आहे. नगर परिषदेचे उपाध्यक्ष संतोष पाटले यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


नगर परिषदेच्या शाळा दत्तक देण्यावर एकमत
मारवाडी शैक्षणिक संस्थेने नगर परिषदेच्या इंजिन शेड शाळेची पडिक इमारत दत्तक घेण्यासंदर्भात केलेल्या विनंतीवर सभेत सविस्तर चर्चा झाली. घनश्याम पानतावणे यांनी शासनाच्या ‘दत्तक शाळा योजनेचा’ संदर्भ देत, सामाजिक हितासाठी प्रतिष्ठित संस्थेला शाळा दत्तक देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक राकेश ठाकूर, अजय अग्रवाल, क्रांती जायस्वाल, अमर रंगारी आणि सुनील भरणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत पाठिंबा दर्शवला.
‘या’ महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मिळाली मंजुरी!
सभेत शहराच्या विकासाशी आणि शिक्षणाशी निगडित अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर एकमताने मंजुरीची मोहोर उमटवण्यात आली:
१. स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने नवीन मुलींची शाळा उभारणे.
२. नगर परिषदेच्या जागेत सुखदेव अग्रवाल यांचा पुतळा उभारणे.
३. न. प. शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करणे.
४. सुभाष गार्डन येथे नागरिकांसाठी भव्य ‘योग भवन’ उभारणे.
५. स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करणे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *