LatestNewsगोंदियाविदर्भ

हरविलेले १० मोबाईल मूळ मालकांना परत; नवेगाव बांध पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सीईआयआर’ पोर्टलची मदत : १.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
नवेगाव बांध :
एकदा हरविलेला मोबाईल पुन्हा मिळण्याची आशा बहुतांश वेळा मावळलेली असते. मात्र, नवेगाव बांध पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व भारत सरकारच्या ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलचा खुबीने वापर करून तब्बल १ लाख १५ हजार ४४८ रुपये किमतीचे १० हरविलेले मोबाईल शोधून काढले आहेत. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले असून, पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे.
पोलीस ठाण्यात हरविलेल्या मोबाईलच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेतली. ‘सीईआयआर’ (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टलच्या माध्यमातून हरविलेल्या मोबाईलच्या आयएमईआय (IMEI) क्रमांकाचा तांत्रिक मागोवा घेण्यात आला. गोंदिया सायबर सेलच्या मदतीने अचूक लोकेशन शोधून पोलिसांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हे मोबाईल हस्तगत केले.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलमध्ये बँक खात्यांची माहिती, वैयक्तिक डेटा आणि महत्त्वाची कागदपत्रे असतात. त्यामुळे मोबाईल गहाळ झाल्यास नागरिकांना मोठी चिंता सतावते. मात्र, आवश्यक कागदपत्रांची कायदेशीर पडताळणी करून पोलिसांनी हे मोबाईल सुरक्षितपणे मूळ मालकांच्या स्वाधीन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता सुरक्षित ठेवण्याच्या पोलिसांच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक गौरव भारे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील, पोलीस नाईक मेंढे आणि पोलीस शिपाई रुखमोडे यांनी या मोहिमेत विशेष परिश्रम घेतले. या कामी गोंदिया सायबर सेलचे मोलाचे सहकार्य लाभले.
■ सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी पोलिसांचे आवाहन
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नवेगाव बांध पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे:
अनोळखी मोबाईल ॲप किंवा कोणतीही APK फाईल डाऊनलोड करू नका.
स्वतःचा OTP, बँक खात्याची माहिती किंवा पासवर्ड कुणालाही सांगू नका.
संशयास्पद लिंक, कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका.
सायबर फसवणूक घडल्यास तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घ्या.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *