LatestNewsगोंदिया

झाडीपट्टीतील दंडार महोत्सवातील ज्येष्ठ नर्तक महादेव औरासे पडद्याआड

अर्जुनी-मोर.: झाडीपट्टीतील दंडार महोत्सवात नर्तकीची भूमिका साकारत आयुष्यभर आपली कला जोपासणारे कुंभीटोला (बाराभाटी) येथील ज्येष्ठ नर्तक महादेव आत्माराम औरासे हे वयाच्या ८५व्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्टला पडद्याआड झाले. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात 18 फेब्रुवारी 1940 ला झाला होता. त्यांच्या निधनाने झाडीपट्टीतील दंडार विश्वावर शोककळा पसरली आहे.

श्री संत गजानन महाराज मंडळाचे सक्रिय सदस्य असलेले औरासे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच नृत्यकला जोपासण्यास सुरुवात केली होती. दंडार महोत्सवात नर्तकीची भूमिका बजावताना त्यांनी आपल्या अद्वितीय कलाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांची कला अख्या विदर्भासह महाराष्ट्रभर गाजली होती.मुंबईतील पु. ल. देशपांडे नाट्यगृहात त्यांनी नृत्यसादरीकरण करून कलाविश्वात ठसा उमटवला होता. त्यांच्या यशामागे झाडीपट्टीतील दंडार परंपरेचे सर्वेसर्वा हरिश्चंद्र बोरकर यांचे व दंडार मंडळाचे प्रमुख गायक पूनेशजी औरासे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. शासन आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये, राजस्थान राज्यातील उदयपूर येथील शिल्पग्राममध्ये, तसेच अमरावती, नागपूर, मुंबई येथे झालेल्या दंडार स्पर्धांमध्ये त्यांनी नर्तकीच्या भूमिकेतून लौकिक मिळवला.औरासे यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमात, तसेच कृषीपुरुष पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या नृत्यकलेने अविस्मरणीय ठसा उमटवला होता. आकाशवाणी नागपूर व सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमांमधूनही त्यांचे सादरीकरण झळकले. गोपनृत्य (गोपन नृत्य) ही त्यांची खासियत ठरली होती.वयाच्या ८५व्या वर्षापर्यंत त्यांनी ही कला जोपासून झाडीपट्टीच्या सांस्कृतिक वारशाला जिवंत ठेवले. त्यांच्या निधनामुळे दंडार परंपरेतील एक तेजस्वी पर्व हरपले आहे.त्यांच्या अंत्य दर्शनाकरिता गावातील महिला पुरुष आबाल वृद्ध व गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर व अन्य प्रतिष्ठित उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *