LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

दरेकसा परिसरात मलेरियाचे थैमान! पोलीस जवानासह चौघांची प्रकृती गंभीर

सालेकसा तालुक्यात २५ जणांना लागण; तीन रुग्णांना सालेकसा तर एकाला गोंदियात हलवलेआरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले; प्रादुर्भाव वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून घरांना भेटी

सालेकसा (गोंदिया) : सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मलेरियाने भीषण रूप धारण केले असून, आतापर्यंत एकूण २५ लोकांना मलेरियाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी चार रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तिघांना ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे, तर एकाला केटीएस रुग्णालय, गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांना ‘पीएफ’ (Plasmodium Falciparum) या घातक स्वरूपाच्या मलेरियाचे संक्रमण झाले असल्याचे उघड झाले आहे.गंभीर रुग्णांमध्ये मुरकुटडोह येथील सशस्त्र दूर क्षेत्र कॅम्पमधील एका ‘सी-६०’ पोलीस जवानाचा समावेश आहे. सालेकसा येथे रेफर करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये निशा दिनेश मडावी (वय २८, रा. कोटीटोला), मषिका चंद्रशेखर सिरजाम (वय २३, रा. कट्टीपार/मुरकुटडोह) आणि सी-६० कॅम्प मुरकुटडोह येथील जवान पांडुरंग शंतोड (वय २९) यांचा समावेश आहे. तसेच कोपालगड येथील सुभाष परते (वय ३५) यांना गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे प्रसार वाढला?छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला दरेकसा परिसर हा डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा भाग आहे. येथे दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. असे असूनही यंदा प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी पुरेशी काळजी घेतली नाही किंवा जनजागृती मोहीम राबवली नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे आजाराचा प्रसार रोखणे कठीण झाले असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.संक्रमण वाढल्यानंतर औपचारिकता!दरेकसा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाचा धोका असतो. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आधी मार्गदर्शन शिबिरे घेतली गेली नाहीत किंवा संवेदनशील गावांना भेटी दिल्या गेल्या नाहीत. आता २५ हून अधिक रुग्ण आढळल्यानंतर आणि आजाराने थैमान घातल्यानंतर आरोग्य कर्मचारी गावात फिरून औपचारिकता पूर्ण करत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *