LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

गोंदियात ३ जूनपासून अतिक्रमणांवर फिरणार बुलडोझर

नगर परिषदेचा अतिक्रमणधारकांना कडक इशारा
पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख ८ मार्गांवर होणार धडक कारवाई.
गोंदिया :
शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर बस्तान मांडून बसलेल्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी गोंदिया नगर परिषदेने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शुक्रवारी, २२ मे २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण नोटीस जारी करत, येत्या ३ जूनपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा थेट अल्टीमेटम अतिक्रमणधारकांना दिला आहे.
शहरातील प्रमुख रस्ते आणि पदपथांवर (फूटपाथ) व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी केलेले अतिक्रमण आता डोकेदुखी ठरत आहे. यावर तोडगा म्हणून नगर परिषदेने अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना दिली आहे. नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधितांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. जर दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढले नाही, तर ३ जूनपासून प्रशासनाकडून थेट बुलडोझरच्या साहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त केले जाईल. या कारवाईत होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस स्वतः अतिक्रमणधारक जबाबदार राहतील, असा कडक इशाराही देण्यात आला आहे. नगर परिषदेच्या या कडक भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून शहराच्या विविध भागात अतिक्रमण करून बसलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, या निर्णयाचे सामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात असून, ही मोहीम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष व नि:पक्षपातीपणे राबवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता ३ जूनपासून प्रशासन किती प्रभावीपणे ही मोहीम राबवते, याकडे संपूर्ण गोंदियाकरांचे लक्ष लागले आहे.
…………..
पहिल्या टप्प्यात ‘या’ प्रमुख मार्गांवर होणार कारवाई
नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी टप्पे निश्चित केले असून, पहिल्या टप्प्यात शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मार्गांना अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे. यात खालील मार्गांचा समावेश आहे:
जयस्तंभ चौक ते नगर परिषद कार्यालय
गोरेलाल चौक ते नेहरू चौक
लोहा लाईन आणि चना लाईन
नेहरू चौक ते सिव्हिल लाईन
शहर पोलीस ठाण्यासमोरून ते प्रीतम चौक
कालेखां कंपनी चौक ते रेल्वे स्टेशन मालधक्का
अवंती चौक ते साई मंदिर
जयस्तंभ ते एलआयसी चौक

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *