भद्रावतीत गोहची (घोरपड) अवैध शिकार; मांस शिजवण्याच्या तयारीत असलेले तीन तस्कर गजाआड!
चिचोली गावात मध्यरात्री छापा; कच्चे व शिजवलेले मांस, लोखंडी धारदार हत्यारे जप्त
वनविभागाची धडक कारवाई:
भद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील चिचोली गावामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अत्यंत संरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘गोह’ (घोरपड – मॉनिटर लिझर्ड) या वन्यजीवाची निर्घृण शिकार करून त्याचे मांस शिजवून खाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना वनविभागाने रंगेहात अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने चिचोली गावात छापा टाकून ही मोठी कारवाई केली. आरोपींविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून वन्यजीवाचे मांस आणि शिकारीसाठी वापरलेले लोखंडी धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
गुप्त माहिती मिळताच वनविभागाने रचला सापळा
वनविभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास भद्रावती वनविभागाला एक खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती. चिचोली गावातील काही व्यक्तींनी जंगलातून गोहची शिकार केली असून, त्याचे मांस घरी आणून ते शिजवण्याची तयारी सुरू आहे. माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी राजन तलमले आणि सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) विकास तारसे यांच्या मार्गदर्शनात भद्रावतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या नेतृत्वाखालील वनविभागाच्या विशेष पथकाने तात्काळ चिचोली गावात धाड टाकली.
…………………………………
कच्चे अन् शिजवलेले मांस आढळले; तीन आरोपी जेरबंद!
या छाप्यामध्ये क्षेत्र सहाय्यक व्ही. आर. ठाकरे, वनरक्षक एम. ए. चौधरी, के. डी. कांबळे, इतर वनकर्मचारी आणि पंचांच्या उपस्थितीत संशयित घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी घरात गोहचे कच्चे तसेच शिजवलेले मांस आढळून आल्याने वनअधिकारीही चक्रावून गेले. वनविभागाने तातडीने जप्तीची कारवाई करत हे मांस जप्त केले आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करून घेतली.
……………………………
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: १. नीलेश राहुलगडे (वय ३३ वर्षे, रा. चिचोली) २. निखिल श्रीराम (वय ३० वर्षे, रा. चिचोली) ३. संतोष कातकर (वय ५२ वर्षे, रा. चिचोली)
या तिन्ही आरोपींना वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून केवळ मांसच नव्हे, तर शिकार करण्यासाठी वापरलेली लोखंडी काती (धारदार हत्यार) देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाचे पथक करत आहे.
…………………..
⚠️ वन्यजीव रक्षणासाठी पुढे या!
“वन्यजीवांची शिकार करणे किंवा त्यांच्या अवयवांची, मांसाची तस्करी करणे हा अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात वन्यजीवांशी संबंधित कोणत्याही अवैध कृत्याची माहिती मिळाल्यास ती तातडीने वनविभागाला द्यावी, जेणेकरून वन्यजीवांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल,” असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.


