तुमसरात एसटी थेट नालीत खचली; ३५ प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले!
नव्या नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह; चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी जीवितहानी टळली
तुमसर (भंडारा ) : तुमसर शहरातील तुमसर-गोंदिया बायपास मार्गावर नव्याने करण्यात आलेल्या नालीच्या निकृष्ट बांधकामामुळे शुक्रवारी (दि. २७) एक अतिशय भीषण अपघात घडता घडता राहिला. तुमसर आगाराची प्रवाशांनी भरलेली एसटी बस थेट नव्या नालीमध्ये रुतल्याने बसमधील सुमारे ३० ते ३५ प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने चालकाने दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे एक मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेमुळे प्रशासनाच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.
नालीचे काम झाले अन् पहिल्याच पावसात खचली!
मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर येथून गोंदियाकडे जाण्यासाठी निघालेली तुमसर आगाराची नियमित एसटी बस (क्रमांक एमएच १३ – सीयू ८३३८) तुमसर-गोंदिया बायपास मार्गावरून जात होती. या मार्गालगत अलीकडेच पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, या उद्देशाने नवीन नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, बस या नव्या बांधकामाच्या भागावरून जात असतानाच, नालीने वाहनाचा भार सहन न केल्यामुळे अचानक बसची दोन्ही चाके नालीमध्ये खोलवर रुतली. बस एका बाजूला तीव्र झुकल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकाच खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी मृत्यूचे सावट पसरले होते.
…तर थेट नागरिकांच्या घरावर कोसळली असती बस!
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात घडला, त्या नालीला लागूनच स्थानिक नागरिकांची निवासी घरे आहेत. बस नालीत आणखी खोलवर सरकली असती किंवा उलटली असती, तर ती थेट शेजारील घरांवर कोसळली असती. यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांसह बसमधील प्रवाशांची मोठी जीवितहानी झाली असती. हा भीषण प्रसंग पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत बचाव कार्यात मदत केली आणि तीव्र चिंता व्यक्त केली.
भ्रष्ट नाली बांधकामाची तातडीने चौकशी करा; जनतेची मागणी!
या खळबळजनक घटनेनंतर नुकत्याच अब्जावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नाली बांधकामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून आणि सदोष पद्धतीने केल्यामुळेच पहिल्याच प्रवासात नाली खचली का? अशी संतप्त चर्चा परिसरात रंगली आहे. संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बायपास मार्गावरील या संपूर्ण नाली बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी आता ‘देशोन्नती’च्या माध्यमातून नागरिकांनी लावून धरली आहे.


