LatestNewsगोंदियाविदर्भ

वन विभागाच्या सापळ्यात अडकले तीन सागवन तस्कर

डोंगरगाव वनविभागाची कारवाई
बोलेरो पिकअपसह लाखोचा माल जप्त
सडक अर्जुनी :
वनसंपदेची तस्करीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. डोंगरगाव डेपो वनविभागाच्या पथकाने अवैध लाकूड तस्करांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. साले-धारणी मार्गावर डोंगरगाव डेपो परिसरात पहाटेच्या सुमारास रचलेल्या थरारक सापळ्यात ३ अट्टल सागवान तस्करांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या धडक कारवाईत तस्करांकडून लाखो रुपयांचे मौल्यवान सागवान आणि तस्करीसाठी वापरण्यात येणारे बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे आंतरजिल्हा वनमाफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सहवनक्षेत्र डोंगरगाव डेपो आणि पांढरणी बफर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सागवान लाकडाची अवैध तस्करी होत असल्याच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने रात्रीपासूनच साले-धारणी-डोंगरगाव मार्ग आणि जंगल परिसरात दबा धरून बारीक नजर ठेवली होती. दरम्यान, पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास एक बोलेरो पिकअप अत्यंत संशयास्पदरीत्या येताना दिसली. वन पथकाने अजिबात वेळ न दवडता गाडीला चहूबाजूंनी वेढा घातला. वन पथकाला अचानक समोर पाहून तस्करांची पुरती भंबेरी उडाली आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क वन जवानांनी जागीच झडप घालत ३ तस्करांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाई ताब्यात घेतलेल्या बोलेरो पिकअप वाहन क्र.एमएच-३५/एजे-११५४ ची झाडाझडती घेतली असता, त्यात जंगलातून बेकायदेशीरपणे तोडलेले आणि चोरून वाहतूक करीत असलेले मौल्यवान सागवान लाकूड आढळून आले. वन अधिकार्‍यांनी तात्काळ वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून तस्करांविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
ही धाडसी कारवाई क्षेत्र सहाय्यक कु.व्ही.बी.रहिले व सी.एस.डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी पवन कांबळे, मेहबूब सय्यद, विवेक काईट, सहसराम हटवार, माधव मुसळे, वनिता ब्राह्मणकर, शालू मेंडे, यशवंत शेंडे, श्रीकांत बंसोड आणि समीर बंसोड यांनी केली. वनविभागाच्या या कारवाईने आंतरजिल्हा वनमाफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *