जिल्ह्यातील 11971 बालकांना गोवर व रूबेला (MMR) पासुन संरक्षित करणार
जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहिम यशस्वी राबवा : निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे
आश्रमशाळांमधील गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहिम विषयक जिल्हास्तरीय कृतीदल समितीची सभा संपन्न
15 ते 30 सप्टेंबर दरम्यान आश्रमशाळांमधील गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहिम
गोंदिया : राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये अलीकडेच गोवरचे रुग्ण आढळून आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांमध्ये गोवर व रूबेला (MMR) लसीकरण मोहीम दि.15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.त्यानुसार आश्रमशाळांमधील 5 वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीची एक अतिरिक्त मात्रा देवुन बालकांना सरंक्षित केले जाणार आहे.
9 सप्टेंबर रोजी गोवर रूबेला (MMR) विशेष लसीकरण मोहिम विषयक जिल्हास्तरीय कृतीदल समितीची सभा जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहिम बाबतचे प्रस्तावना सादर करुन विस्तृत मोहिम लसीकरण बाबीचे जिल्ह्याची माहिती समिती समोर सादरीकरण केले.
जिल्ह्यातील आरोग्य विभाग, आदिवासी विभाग,शिक्षण विभाग, महीला बाल विकास विभाग यांनी एकत्रित सहकार्याने अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांमधील बालकांना गोवर रुबेला (MMR) या आजारापासुन सरंक्षित करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे यांनी याप्रसंगी दिल्या. डॉ.अभिजीत गोल्हार यांनी याप्रसंगी दि.15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत विशेष गोवर रुबेला (MMR)लसीकरण मोहीम दरम्यान जिल्ह्यातील 48 अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळा मधील 11971 बालकांना गोवर व रूबेला पासुन संरक्षित करण्याचे नियोजन आरोग्य विभागामार्फत केले आहे. त्यासाठी 94 लसीकरण सत्रात 69 आरोग्य सेविका व स्टाफ नर्स यांचे मार्फत लसीकरण करण्यात येणार आहे. 49 पर्यवेक्षका मार्फत पर्यवेक्षक केले जाणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य व साधन सामुग्री त्यात 2659 व्हायल्स, 13309 ए.डी.सिरिंज, 88 हब कटर, 89 एईएफआय किट उपलब्ध करण्यात आलेले आहे. आश्रम शाळेतील व जवळचे शाळेतील शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचे मार्फत पालकांना (MMR) लसीकरणाबाबत माहीती देणे व रजिष्टर वर नोंदी ठेवण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी याप्रसंगी दिली.
ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. गोवरचे विषाणु शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक दोन किंवा तीनही लक्षणे दिसु शकतात. नंतर काही दिवसात सर्व अंगावर पुरळ येणे कालातंराने ते कानाच्या मागे,चेहरा, छाती,पोटावर पसरतात.त्यामुळे वेळीच काळजी घेवुन संभाव्य धोके टाळता येवु शकत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी याप्रसंगी दिली.
गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील “अ” जिवनसत्वाचे प्रमाण कमी होते.”अ” जिवनसत्व प्रमाण कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदुज्वर असे आजार होवु शकतात.जिवनसत्वाची मात्रा गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते. वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. (MMR) लसीचा पहिला डोस नऊ ते 12 महीने या वयोगटात देण्यात येतो. दुसरी मात्रा 16 ते 24 महिन्यामध्ये देण्यात येतो. समितीची सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ञ डॉ.लिना धांडे यांचे सह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच शिक्षण, आदिवासी विभाग, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

