नामांकित कंपन्यांच्या नावाने नकली औषध विकणारे आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त!
आयुर्वेदिक ‘कामराज कॅप्सूल’मध्ये सापडले अॅलोपॅथीचे घटक; नागपूर, युपी, पंजाबमधील विक्रेत्यांवर गुन्हे दाखल.
नागपुरात औषध प्रशासनाची मोठी कारवाई;
नागपूर : नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणाऱ्या बनावट तसेच भेसळयुक्त औषध विक्रेत्यांच्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पर्दाफाश केला आहे. नागपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यांपर्यंत पसरलेल्या या साखळीत अनेक नामांकित औषध विक्रेते, वितरक आणि उत्पादक कंपन्यांचा सहभाग उघडकीस आला असून, संशयितांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे औषध बाजारपेठेत तीव्र खळबळ उडाली आहे.
‘कायमोरल फोर्ट’ निघाल्या बनावट! एफडीए नागपूर विभागाला बाजारात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट ‘कायमोरल फोर्ट’ (Chymoral Forte) या गोळ्यांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यावरून एफडीएच्या पथकाने नागपुरातील विविध ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांकडून औषधांचे नमुने जप्त करून ते मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. प्रयोगशाळेच्या अहवालात या गोळ्यांमधील मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचे घटक असलेले ‘ट्रिप्सिन’ आणि ‘कायमोट्रिप्सिन’ हे एन्झाईम्स निर्धारित मानकांपेक्षा अत्यंत नगण्य प्रमाणात असल्याचे समोर आले.
यानंतर संबंधित मूळ उत्पादक कंपनीकडे चौकशी केली असता, हे औषध त्यांच्या कारखान्यात तयार झाले नसून ते पूर्णपणे बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या तपासातून नागपूर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील १२ औषध विक्रेते आणि पुरवठादारांची आंतरराज्य साखळी उघड झाली.
नागपुरातील ‘या’ नामांकित फार्मा कंपन्यांवर गुन्हे साजिश रचून बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी नागपुरातील मे. मेडिसेल्स, मे. उज्ज्वल फार्मा, मे. नॅशनल मेडिकल अँड कॉस्मेटिक्स, मे. सिद्धार्थ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, मे. मयूर फार्मा, मे. डिसेंट फार्मा आणि मे. पीयूष फार्मा यांच्यासह इतर पुरवठादारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुर्वेदिक औषधात अॅलोपॅथीची धक्कादायक भेसळ दुसऱ्या एका कारवाईत एफडीएने ‘कामराज कॅप्सूल’ या आयुर्वेदिक उत्पादनाची प्रयोगशाळेत तपासणी केली. या तपासणीत आयुर्वेदिक असल्याचा दावा करणाऱ्या या कॅप्सूलमध्ये ‘टॅडालाफिल’ आणि ‘पॅरासिटामोल’ हे अॅलोपॅथिक घटक आढळून आले. विशेष म्हणजे, औषधाच्या वेष्टनावर (लेबल) या घटकांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता.
आयुर्वेदिकच्या नावाखाली सर्रास अॅलोपॅथीची भेसळ करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूरची मे. विन्स फार्मास्युटिकल्स, उत्तर प्रदेशची मे. अल्टिमेट आयुर्वेद (मुझफ्फरनगर) आणि जालंधर (पंजाब) येथील मे. ब्रह्मानंद आयुर्वेदा प्रा. लि. या कंपन्यांविरुद्ध नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीएचे अधिकारी या रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी पुढील तपास करत आहेत.


