LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

६० फूट खोल विहिरीत पडलेल्या मादी अस्वलाला जीवदान! कारंजा घाडगे जवळील चिंचोली येथील घटना; वन विभागाची कामगिरी

 कारंजा घाडगे (वर्धा): तालुक्यातील चिंचोली परिसरातील एका ६० फूट खोल सुक्या विहिरीत पडलेल्या सुमारे दोन वर्ष वयाच्या मादी अस्वलाला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत कौशल्याने सुखरूप बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीनंतर या अस्वलाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) मुक्त करण्यात आले असून, या मोहिमेत कारंजा पोलिसांचेही मोठे सहकार्य लाभले.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास चिंचोली येथील शेतकरी गणेश रामकृष्ण तांबूस्कर यांच्या शेतातील सुक्या विहिरीत एक अस्वल पडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहले यांना मिळाली. विहीर ६० फूट खोल आणि पूर्णपणे जर्जर अवस्थेत असल्याने अस्वलाला बाहेर काढणे मोठे आव्हानात्मक होते. अस्वल विहिरीतून बाहेर पडण्यासाठी प्रचंड संघर्ष करत होते. माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची बिकट अवस्था पाहता, अस्वलाला कोणतीही दुखापत न होता बाहेर काढण्यासाठी विशेष पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात आली. ही यशस्वी कामगिरी उपवनसंरक्षक हरवीर सिंह, सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहले यांच्या नेतृत्वात पार पडली. “विहीर खूप खोल आणि जीर्ण असल्याने अस्वलाचा जीव वाचवणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान होते, पण टीमच्या सतर्कतेमुळे मोहीम यशस्वी झाली. या बचाव मोहिमेत एस. बी.केकान, ए. के. गरे, दीपक कंदीकर, सी. एम. उईके, एस. बी. नागोसे, व्ही. एस. आंबोलकर, एस. व्ही. बुट्टे, वाय. पी. अरसड, सूरज कोरती, पुरुषोत्तम कलसाईत, गौरव कोरती, आयुष सातपुते, गणेश काजे, स्वप्निल कोरती आणि भावेश नासरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वन्यजीव प्रेमी आणि परिसरातील नागरिकांनीही या मोहिमेत वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.

पिंजरा विहिरीत उतरवला
 अत्यंत सावधगिरी बागतत पथकाने तो पिंजरा दोरीच्या सहाय्याने विहिरीत खाली सोडला. अस्वल पिंजऱ्यात जेरबंद: काही वेळाच्या प्रयत्नांनंतर मादी अस्वल त्या पिंजऱ्यात शिरली. त्यानंतर तिला सुखरूप वर काढण्यात आले. उपस्थित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अस्वलाची तपासणी केली. अस्वल पूर्णपणे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तिला तातडीने जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले. 

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *