चामोर्शीत संतापाचा उद्रेक! ७ वर्षांच्या बालिकेवरील अत्याचाराने शहर पेटले; पोलीस ठाण्याला महिलांचा वेढा!
नराधमाला फाशी द्या; शहरात कडकडीत बंद
चामोर्शी (गडचिरोली) : येथील एका अवघ्या ७ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ११ जून रोजी संपूर्ण चामोर्शी शहरात तीव्र जनआक्रोश उसळला. हजारो महिलांसह विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी संघटनांनी एकत्र येत शहरात कडकडीत बंद पाळला. संतप्त महिलांनी ‘लक्ष्मी गेट’पासून थेट पोलीस ठाण्यावर विराट मोर्चा काढत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आक्रमक मागणी केली. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जून रोजी ही घृणास्पद आणि काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती. घराला रंग देण्याचे काम करण्यासाठी आलेल्या प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर (वय २४) या नराधमाने चिमुकलीसोबत हे कुकर्म केले होते. नराधमाला पोलिसांनी गजाआड केले असून तो सध्या कोठडीत आहे. मात्र, ‘पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे’ आणि ‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’ अशा संतप्त घोषणांनी संपूर्ण चामोर्शी परिसर दणाणून गेला होता.
मोर्च्याची तीव्रता पाहता जोपर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः येत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला. वाढता रोष पाहता, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तत्काळ चामोर्शी गाठले व आंदोलकांशी थेट संवाद साधला. त्यांनी पीडित कुटुंबीय आणि महिला प्रतिनिधी मंडळासोबत सविस्तर चर्चा करून तपासाच्या प्रगतीची माहिती दिली. तसेच ‘३० दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल’ आणि दोषीला कठोर शिक्षेचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन शांत झाले. याप्रकरणी नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, नगरसेविका ॲड. प्रेमा आईंचवार, वंदना चौथाले, वंदना म्हस्के, नगरसेवक राहुल नैताम, अमोल आईंचवार, ॲड. डिंपल उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते माणिक तुरे आदींच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक, तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक अनिकेत हिरडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
…………………….
‘त्या’ बेजबाबदार डॉक्टरांचीही होणार चौकशी!
पीडित बालिकेच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान काही डॉक्टरांकडून कमालीचा हलगर्जीपणा व दिरंगाई झाल्याचा गंभीर आरोप महिला संघटनांनी लावून धरला. त्यामुळे काही काळ प्रशासनाची कोंडी झाली होती. यावर पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, संबंधित वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टरांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

