Railway News; मध्य रेल्वेचा नागपूर विभाग मालवाहतुकीच्या क्षेत्रात यंदा भरीव यश
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मालवाहतुकीच्या क्षेत्रात यंदा भरीव यश मिळवत आर्थिक प्रगतीचा एक नवा टप्पा गाठला आहे. एकट्या जुलै महिन्यात एकूण ८३१ रॅक लोड करून तब्बल ३३३.५८ कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. विशेष म्हणजे, यंदा मालवाहतुकीच्या एका नव्या प्रकारातही भर पडली आहे.
कोळसा, सिमेंट, लोखंड, कंटेनर आणि दुसऱ्या वेगवेगळ्या वस्तू, साहित्याची नागपूर विभागातून मोठ्या प्रमाणात रेल्वेने मालवाहतूक केली जाते. जास्तीच्या सोयी दिल्या आणि उत्पादक कंपन्या, संस्थांना सोबत घेतले तर मालवाहतुकीत आणखी भर घालता येईल. परिणामी रेल्वेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात गंगाजळी जमा करता येईल, हे ध्यानात घेऊन रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या योजना, उपक्रम सुरू केले आहे. त्याचे चांगले परिणाम समोर येत असून, गेल्या १ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारची मालवाहतूक करून रेल्वेने ३३३ कोटी, ५८ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच बल्लारशाह येथून ‘आयरन पेललेटस्’ (लोह धातूचे रुपांतरित स्वरूप)ची वाहतूक करून रेल्वेने मालवाहतुकीच्या एका नव्या प्रकारात भर घातली आहे. आयरन पेललेट्सच्या ८ रॅकची वाहतूक करून रेल्वेने ५ कोटी, ४२ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

वस्तूनिहाय मालवाहतुकीचे स्वरूप
कोळसा वाहतूक : ५६९ रॅक, २४०.७४ कोटींचे उत्पन्न.
लोहधातू वाहतूक : ४१ रॅक, ३०.११ कोटी (गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात १२२ टक्के वाढ).
गूळ : २ रॅक, १.३३ कोटी (गेल्या वर्षीच्या तुलनेत १४७ टक्के वाढ),
फेरो मॅग्निज : २ रॅक, ९२ लाख (४४ टक्के वाढ),
कंटेनर : ११० रॅक, १७. ३८कोटी (१४ टक्के वाढ),
क्लिंकर : ३४ रॅक, १९.८९ कोटी (१०० टक्के वाढ),
आयरन स्लॅग : १३ रॅक, ४.९१ कोटी (११५५ टक्के वाढ)
गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची भर मालवाहतूकच्या या प्रगतीमागे उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा, कामकाज सुलभीकरण आदींसोबतच स्थानिक उद्योजकांशी संपर्क करून त्यांना दिलेला विश्वास कारणीभूत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ७८८ रॅक लोड करून २९६.१४ कोटींचे उत्पन्न मिळवले होते. यावर्षी त्यात १३ टक्क्यांची भर पडली आहे.