दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा भीषण हल्ला; २५ जण जखमी
दीड वर्षाच्या बालकासह ६ जणांची प्रकृती चिंताजनक
नवेगावबांध/देवलगाव (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगाव नजीकच्या कवठा येथील प्रसिद्ध कोकणाई माता मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला चढवला. या घटनेत लहान मुलांसह एकूण २५ भाविक जखमी झाले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना आज, शुक्रवारी दुपारी १ ते १:३० च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येरंडी देवलगाव येथील रहिवासी दिनेश लक्ष्मण बागडे यांच्याकडे शुक्रवारी कौटुंबिक जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने त्यांचे अनेक नातेवाईक सावरटोला, परसोडी आणि चोप कोरेगाव येथून आले होते. दुपारी जेवणापूर्वी सर्व नातेवाईक नैवेद्य अर्पण करण्यासाठी आणि दर्शनासाठी जवळच असलेल्या कवठा येथील कोकणाई मंदिरात गेले होते. मंदिरात प्रवेश करत असतानाच झाडावर असलेल्या मधमाशांच्या मोहोळाने अचानक भाविकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भाविकांची मोठी धावपळ झाली. मधमाशांनी लहान मुले आणि महिलांना लक्ष्य केले. जखमींना तातडीने नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात सावरटोला येथील फॅमिला तरोणे (३२), कुणाल तरोणे (१२), माही तरोणे (१०), सुनीता तरोणे (४२) तसेच येरंडी देवलगाव येथील काजल बागडे (२७), तेजस बागडे (१.५ वर्ष), सुषमा बागडे (२५), प्रिन्स बागडे (१०), आयुष नेवारे (१०), जीवनकला नेवारे (४२), दर्पण राऊत (११), पार्वता राऊत (६०), सविता बागडे (२५), मीराबाई हेमने (३३), प्रतीक्षा नेवारे (२३), दिव्या मेंढे (१४), अंतरिक्ष राऊत (१८), विजया कोवे (६५), रिंकल बागडे (३), श्रेयांस बागडे (६), सलोनी राऊत (१६), कुणाल मेंढे (१४) आणि चीपेश्वर पातोडे (१८, परसोडी), कल्याणी दुधकुवर (१६, चोप कोरेगाव) असे एकूण २५ जण जखमी झाले आहेत.
“दुपारी ३ च्या सुमारास सर्व जखमींना रुग्णालयात आणले गेले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. ज्या सहा रुग्णांना मधमाशांनी जास्त प्रमाणात चावा घेतला आहे, त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांना केटीएस जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे संदर्भीत करण्यात आले आहे.
— डॉ. प्रदीप आनंद, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध
आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून जखमींची विचारपूस
कोकणाई मंदिरात मधमाशांच्या हल्ल्यात भाविक जखमी झाल्याची बातमी समजताच अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला सारून तातडीने नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.रुग्णालयात पोहोचताच त्यांनी प्रत्येक जखमीची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि धीर दिला. विशेषतः जखमी लहान मुलांच्या प्रकृतीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आनंद यांच्याशी चर्चा करून उपचारांच्या सुविधेचा आढावा घेतला.

