जिल्ह्यात दशकपुर्तताअंती ५८ आरोग्य संस्थांमध्ये १ लाख २८ हजार ७७९ गरोदर मातांची तपासणी!
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपुर्ती वाटचाल
गोंदिया : “सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत” हे घोषवाक्य घेऊन देशभरात माता बाल संगोपन आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यात येत आहे. या अंतर्गत अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला’ (PMSMA) यशस्वी १० वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकवर्षपूर्ती निमित्त आज ९ जून रोजी जिल्ह्यात विशेष आरोग्य शिबिरे व उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या अभियानांतर्गत तब्बल १ लाख २८ हजार ७७९ गरोदर मातांची यशस्वी तपासणी करण्यात आली असून, जिल्ह्यातील ५८ आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ही सेवा अविरतपणे दिली जात आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महत्त्वपूर्ण अभियान असलेल्या ‘PMSMA’ ची सुरुवात ९ जून २०१६ रोजी झाली होती. गर्भधारणेच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर महिलांना निश्चित दिवशी, मोफत, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण प्रसूतीपूर्व आरोग्य सेवा (ANC) उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक महिन्याच्या ९, १८ व २७ तारखेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष तपासणी सत्रांचे आयोजन केले जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली. गेल्या १० वर्षांत या अभियानाने उच्च जोखीम गर्भधारणा (High-Risk Pregnancy – HRP) असलेल्या महिलांची वेळीच ओळख पटवून त्यांच्यावर योग्य उपचार, निदान व संदर्भ सेवा बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विस्तारित PMSMA (e-PMSMA) अंतर्गत अशा उच्च जोखीम मातांची नावनिहाय नोंदणी केली जात असून, प्रसूतीनंतर ४५ दिवसांपर्यंत त्यांची नियमित देखरेख व पाठपुरावा सुनिश्चित केला जात असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी दिली आहे.
या १० वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), ग्रामीण रुग्णालये (RH), उपजिल्हा रुग्णालये (SDH) आणि जिल्हा रुग्णालयांसह (DH) सर्व ५८ नामांकित आरोग्य संस्थांमध्ये विशेष PMSMA सत्रे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा विशेष प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत गरोदर मातांची तपासणी केली जाईल. तसेच सर्व आवश्यक रक्त, मूत्र चाचण्या आणि अल्ट्रासोनोग्राफी (USG) सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरांमधील ANM व ASHA कार्यकर्त्यांमार्फत उच्च जोखीम मातांच्या किमान तीन फॉलो-अप भेटी आणि योग्य समुपदेशन सुनिश्चित केले जाईल. या दशकपूर्तीनिमित्त स्थानिक भाषेत पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया आणि समुदाय बैठकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती (IEC) केली जात असून शिबिराच्या दिवशी सर्व लाभार्थी व सेवांची माहिती तातडीने ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निमित्ताने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी, विशेषतः पहिल्या किंवा दुसऱ्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या अथवा उच्च जोखीम असलेल्या मातांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित मातृत्व सुनिश्चित करावे. तर सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी सांगितले की, माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाचे हे अभियान अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. कुटुंबातील सदस्यांनी गरोदर मातेला या शिबिरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे, जेणेकरून वेळेत तपासणी होऊन संभाव्य धोके टाळता येतील. सुरक्षित गर्भधारणा आणि निरोगी बाळ हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
……………………………………..
सुरक्षित मातृत्व सुनिश्चित करावे! “जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी, विशेषतः पहिल्या किंवा दुसऱ्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या अथवा उच्च जोखीम असलेल्या मातांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन आयोजित विशेष शिबिराचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित मातृत्व सुनिश्चित करावे.”
- डॉ. अभिजीत गोल्हार, (जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया)
…………………………………..
कुटुंबाने सहकार्य करावे! “माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाचे हे अभियान अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. कुटुंबातील सदस्यांनी गरोदर मातेला या शिबिरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे, जेणेकरून वेळेत तपासणी होऊन संभाव्य धोके टाळता येतील.” - डॉ. अरविंदकुमार वाघमारे, (सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी)

