LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

वरोरा रेल्वे स्थानकावरून अपहरण, मारडा धरणाच्या नाल्यात केला गेम! महिला नातेवाईकाच्या छळाचा सूड; आरोपींना २४ तासांत बेड्या

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; छिन्नविछिन्न मृतदेहाचे गूढ उकलण्यात यश, तीन आरोपी गजाआड.
चंद्रपूर/यवतमाळ :
नातेवाईक असलेल्या एका महिलेची सतत छेड काढून तिला मानसिक व शारीरिक जाच देणाऱ्या एका ४२ वर्षीय इसमाचा पोटच्या नातेवाईकाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी आधी त्या इसमाला दारू पाजून बेसावध केले आणि त्यानंतर मारेगाव तालुक्यातील मारडा धरण परिसरातील गोरज शिवारात नेऊन त्याचा गळा आवळून निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकून दिला होता. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या २४ तासांत तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विनोद सहारे (वय ४२, रा. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंतनू प्रवीण झाडे (वय १८, रा. नागरी, ता. वरोरा), प्रविण वरघणे (वय ३५) व राजू ढेंगळे (वय ३५, रा. दांडगाव) या तिघांना अटक केली आहे.
महिलेला त्रास दिल्याने रचला खुनाचा कट पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील नागरी येथील शंतनू झाडे याच्या घरी त्याची एक महिला नातेवाईक वास्तव्यास आली होती. मृत विनोद सहारे हा देखील त्याच गावात नागरी येथे काम करत असल्याने त्याची या महिलेसोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत विनोद सहारे याने त्या महिलेला विनाकारण त्रास देण्यास व छेड काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने आपल्या घरी राहणाऱ्या शंतनू झाडे याला आपबिती सांगितली. महिला नातेवाईकाचा छळ होत असल्याचे पाहून शंतनूचा पारा चढला. त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून विनोदचा गेम करण्याचा कट रचला.
आधी दारू पाजली, मग जंगलात आवळला गळा! ठरलेल्या कटानुसार ३ जून रोजी आरोपींनी विनोद सहारे याला वरोरा रेल्वे स्थानकावरून गाठले. त्याला विश्वासात घेऊन आधी भरपूर दारू पाजण्यात आली. विनोद पूर्णपणे नशेत बेसावध झाल्यानंतर आरोपींनी त्याला दुचाकीवर बसवून मारेगाव हद्दीतील मारडा धरणाच्या निर्जन परिसरात नेले. तिथे गोरज शिवारातील जंगलात आरोपींनी विनोदवर प्राणघातक हल्ला करत त्याचा गळा आवळून खून केला. हत्येचा संशय येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा म्हणून त्यांनी मृतदेह जवळच असलेल्या एका नाल्यात फेकून दिला आणि पळ काढला.
………………………
‘लोखंडी कडे’ अन् ‘तंबाखूच्या डबी’ने उघडले गुपित!
५ जून रोजी मारडा धरणाजवळील नाल्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कुजलेला मृतदेह बाहेर काढला, मात्र त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटवणे कठीण होते. घटनास्थळी मृतदेहाच्या हातात सापडलेले लोखंडी कडे आणि खिशात मिळालेली तंबाखूची डबी तपासाचा मुख्य धागा ठरली. पोलिसांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करताच मृताची ओळख पटली आणि तपासाला वेग आला. सदर घटना मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने मारेगावचे ठाणेदार श्याम वानखेडे आणि यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने संयुक्त पथक तयार केले. शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, दिगंबर किनाके, सागर दीपेवार, राजन इसंकार, इक्बाल शेख व अजय वाभिटकर यांनी ६ जूनच्या रात्रीच शंतनू झाडेसह तिन्ही आरोपींना हुडकून काढत मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यामुळे वणी व वरोरा परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *