LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

अहेरी तालुक्यात भीषण अपघात: भरधाव दुचाकी झाडावर आदळली; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू, ४ मित्र जखमी!

तानबोडी-विजयपूर मार्गावरील घटना; लग्नाला जाणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, ‘ट्रकच्या धडकेची’ अफवा चौकशीअंती फोल.
अहेरी (गडचिरोली):
तालुक्यातील तानबोडी-विजयपूर मार्गावर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या भीषण अपघातात एका १८ वर्षीय कोवळ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे इतर चार मित्र किरकोळ जखमी झाले आहेत. रोशन संतोष मडावी (वय १८, रा. तानबोडी) असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे तानबोडी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (६ जून) रात्री ९ वाजेच्या सुमारास रोशन मडावी हा त्याचा मित्र रितेश सिडाम याच्या ‘एमएच ३३ एसएस १८३६’ क्रमांकाच्या दुचाकीवरून इतर मित्रांसह तानबोडी येथून किष्टापूर येथे एका लग्न समारंभासाठी निघाला होता. एकाच दुचाकीवर रोशनसह प्रमोद कुमराम, अखिल गावडे, प्रभाकर सडमेक आणि रितेश सिडाम असे पाच मित्र प्रवास करत होते.
ताबा सुटला अन् काळजाचा थरकाप उडाला! तानबोडी-विजयपूर मार्गावरील जंगल परिसरात आले असता, अचानक दुचाकीचा तोल गेला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याने भरधाव दुचाकी रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन थेट आदळली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातामध्ये रोशन मडावी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच बेशुद्ध पडला, तर त्याचे इतर मित्र किरकोळ जखमी झाले.
उपचारादरम्यान मृत्यू; अपघाताबाबत अफवा फोल घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रोशनची प्रकृती चिंताजनक असल्याने रविवारी (७ जून) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातानंतर एका अवजड ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची अफवा परिसरात पसरली होती, मात्र पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात व चौकशीअंती हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून दुचाकी झाडावर आदळल्यानेच अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.
अकस्मात मृत्यूची नोंद या प्रकरणी अपघातातून बचावलेले प्रभाकर दशरथ सडमेक (वय २७, रा. तानबोडी) यांनी अहेरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक मनीषा मुलकवार यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील अधिक तपास अहेरी पोलीस करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *