LatestNewsगोंदियाविदर्भ

Soil Testing Lab : गावपातळीवर 15 मृद चाचणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्ह्याला शासनाकडून मंजुरी

• कृषि विभागामार्फत 1.50 लाखांचे अनुदान
• तरुण-तरुणींना प्रयोगशाळा उभारण्याची संधी
गोंदिया :
 राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम वर्ष 2025-26 अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण 15 मृद परीक्षण केंद्राची उभारणी केली जाणार असून यासाठी दहावी उत्तीर्ण तरुण व तरुणींना संधी देण्यात येणार आहे. प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येईल.  विविध रासायनिक खते व औषधांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. याशिवाय हवामानातील बदलाचा परिणामही जमिनीवर होत असून त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत मृद परीक्षणाची गरज अधिक भासु लागली आहे. गेल्या काही वर्षात शेतकरी जागरुक झाले असून मृद परीक्षण करुन घेत आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत.
 राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत गावपातळीवरील प्रयोगशाळांसाठी इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांकडून प्रस्ताव/अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेची वार्षिक मृद नमुना तपासणी क्षमता 3 हजार नमुने इतकी असणार आहेत. यातील पहिल्या 300 नमुन्यांची तपासणी दर नमुन्यावर 300 रुपये शासनाकडून दिले जातील. त्यानंतर पुढील 500 मृद नमुन्यांना 20 रुपये प्रति नमुना याप्रमाणे प्रोत्साहन निधी देण्यात येईल. उर्वरित 2200 नमुन्यांची तपासणी संबंधीत प्रयोगशाळा स्वत:च्या खर्चावर शासन दरानुसार शेतकऱ्यांकडून शुल्क आकारुन करु शकेल.
कोण व कधीपर्यंत अर्ज करु शकेल : प्रयोगशाळा उभारण्यासाठी अर्ज करणाऱ्या तरुण-तरुणींनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयाची मर्यादा 18 ते 27 वर्षे इतकी आहे. शेतकरी उत्पादक संस्था, कृषि क्लिनिक व कृषि व्यवसाय केंद्र, माजी सैनिक, बचतगट किरकोळ खते विक्रेते, शाळा, महाविद्यालये, युवक व युवती असे अनेक पात्र घटक अर्ज करु शकतात. अर्जाची छाननी जिल्हा पातळीवरील समिती मार्फत केली जाणार असून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.  संबंधित अर्ज तालुका कृषि अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद परीक्षण अधिकारी गोंदिया आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गोंदिया यांच्याकडे 25 ऑगस्ट 2025 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात 15 मृद परीक्षण प्रयोगशाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करुन स्वत:ची प्रयोगशाळा तयार करावी व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *