LatestNewsगुन्हेवार्तामहाराष्ट्र

crime news : मृत झाल्याचे नाट्य रचून निरपराधाला जाळून मारले

२४ तासांत लातूर पोलिसांनी उधळला डाव : इन्शुरन्ससाठी केलेला थरारक बनाव उघडकीस
लातूर:
एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सचा लाभ कुटुंबाला मिळावा आणि सत्तावन लाखांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव रचत निरपराध इसमाचा निघृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना औसा तालुक्यात उघडकीस आली आहे. मात्र लातूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा थरारक कट अवघ्या २४ तासांत उघड झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास वानवहा पाटी ते वानवडा रोडवर अगरवाल यांच्या शेताजवळ उभ्या असलेल्या एका गाडीला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. (crime news ) त्यानंतर औसा पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीतील अधिकारी व अमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली असता, गाडीच्या आत अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंदवून तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी आढळलेल्या वाहनाचा क्रमांक एम. एच. ४३ ए. बी. ४२०० असा असून तो बळीराम गंगाधर राठोड यांच्या नावावर नोंद असल्याचे स्पष्ट झाले. सदर वाहन त्यांचा मेव्हणा गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठलनगर, औसा) वापरत असल्याची माहिती मिळाली. प्राथमिक तपासात वाहनातील जळालेल्या कड्याच्या आधारे मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते. त्यानुसार डीएनए नमुने घेत मृतदेह तात्पुरत्या अटीवर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलिसांना संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून गणेश चव्हाण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथून गणेश चव्हाण याला ताब्यात घेतले. (crime news ) विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने धक्कादायक कबुली दिली. आर्थिक अडचणी, मोठ्या प्रमाणावरील कर्ज आणि एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स यामुळे त्याने हा भयंकर कट रचल्याचे सांगितले.

आरोपीने कबूल केल्याप्रमाणे, दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर औसा याकतपूर रोड चौकात गोविंद किशन यादव (वय ५०, रा. पाटील गल्ली, औसा) यांना लिफ्ट दिली. दारूच्या नशेत असलेल्या यादव यांना निर्जन ठिकाणी नेऊन, त्यांना गाडीत झोपलेल्या अवस्थेत ड्रायव्हर सीटवर बसवून, मॅचिसच्या काड्या व प्लास्टिक पिशव्या टाकून गाडी पेटवून दिली. पुरावा नष्ट व्हावा म्हणून पेट्रोल टाकीचे झाकण उघडे ठेवून तो घटनास्थळावरून फरार झाला. (crime news ) यानंतर आरोपी तुळजापूर मोड येथे पायी जाऊन कोल्हापूर व पुढे विजयदुर्ग येथे लपून बसला. मात्र पोलिसांच्या अचूक तपासामुळे त्याचा बनाव उघड झाला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतुल डाके यांच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाळे करीत आहेत. हा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक अमोल तांबे व उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केला आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे इन्शुरन्ससाठी रचलेला हा थरारक कट वेळेत उघडकीस आला असून, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *