LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

अमरावतीकरांना सायबर चोरांचा मोठा दणका; अवघ्या ५ महिन्यांत २.२२ कोटींवर मारला डल्ला!

शेअर मार्केट गुंतवणूक ठरतेय ‘महासापळा’; सायबर पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल, अमरावतीत खळबळ

अमरावती : डिजिटल क्रांतीच्या युगात अमरावती शहरात ऑनलाइन फसवणुकीचे अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर आले आहे. जानेवारी ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत सायबर चोरांनी अमरावतीकरांच्या खिशावर तब्बल २ कोटी २२ लाख ८६ हजार ३३८ रुपयांचा मोठा दरोडा टाकला आहे. या पाच महिन्यांत शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे एकूण १७ गुन्हे नोंदवण्यात आले असून, अमरावतीकरांच्या कष्टाच्या पैशांवर सायबर चोरांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे.या सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण केले असता, चोरांनी अमरावतीकरांना फसवण्यासाठी ‘शेअर मार्केट गुंतवणूक’ या नावाचा सर्वाधिक वापर केल्याचे दिसून येते. एकूण १७ गुन्ह्यांपैकी तब्बल ७ गुन्हे हे एकट्या शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीचे आहेत. घरबसल्या अल्पावधीत करोडपती होण्याच्या किंवा अवाजवी परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे नागरिकांनी आपले लाखो रुपये अनधिकृत ट्रेडिंग ॲप्स आणि खोट्या सल्लागारांच्या हवाली केले आहेत.सायबर गुन्हेगार केवळ एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या नवनवीन आमिषांनी नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. शेअर मार्केटच्या पाठोपाठ ऑनलाइन फसवणूक या सर्वसाधारण प्रकारात ३ गुन्हे दाखल झाले आहेत. उर्वरित ७ गुन्ह्यांमध्ये चोरांनी विविध क्लृप्त्या वापरल्या आहेत. यामध्ये वर्क फ्रॉम होम टास्कच्या नावाखाली १, यूट्यूब चॅनल लाइक्स करण्याच्या आमिषाने १, इन्स्टंट लोन ॲपच्या जाळ्यात ओढून १, ऑनलाइन ई-लिलावाच्या नावाखाली १, मोबाईल टॉवर इन्स्टॉलेशनच्या बहाण्याने १, डेबिट कार्ड क्लोनिंग किंवा फ्रॉड करून १ आणि नामांकित कंपन्यांची बनावट डिस्ट्रिब्युटरशिप देण्याच्या बहाण्याने १ अशा गुणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा अद्यापपर्यंत तरी शहरात ‘डिजिटल अरेस्ट’चा एकही प्रकार घडलेला नाही.जरी सायबर गुन्हेगारांनी २ कोटी २२ लाख ८६ हजार ३३८ रुपयांची एकूण फसवणूक केली असली, तरी अमरावती शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झालेली ४५ लाख ४० हजार ३०७ रुपयांची रक्कम ‘होल्ड’ म्हणजेच गोठवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे ही रक्कम सायबर चोरांच्या हाती लागण्यापासून वाचली आहे. याशिवाय ६ लाख ३० हजार रुपये पीडितांना यशस्वीरीत्या परत मिळवून देण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित मोठी रक्कम चोरांनी पळवून नेली आहे.कुठल्याही प्रकारची ऑनलाईन वा सायबर फ्रॉड झाल्यास नागरिकांनी तातडीने सायबर हेल्पलाईन किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एपीआय अनिकेत कासार यांनी केले आहे. नागरिकांनी अनोळखी ऑफर्स आणि लिंकपासून अत्यंत सावध राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *