LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

दर्यापुरात पोलिसांचा ‘थर्ड आय’ अ‍ॅक्टिव्ह; तलवारीने केक कापणाऱ्या भाईंची मुजोरी उतरवली!

६ गुंड गजाआड; १७ मद्यपींसह बुलेट राजांनाही दिला ‘धणका’; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

दर्यापूर (अमरावती) : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दर्यापूर पोलिसांनी ५ जून रोजी धडक मोहीम राबवून एक मोठी कारवाई केली आहे. शहरात स्वतःला ‘भाई’ समजून भाईगिरी करणाऱ्या आणि कायद्याची ऐशीतैशी करणाऱ्या हुल्लडबाजांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून दहशत पसरवणारी ६ जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. यासोबतच विनाक्रमांक वाहने पळवणारे आणि मोकळ्या जागेत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या १७ मद्यपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण धडक कारवाईत पोलिसांनी वाहने आणि घातक हत्यारांसह तब्बल १३ लाख ८१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ‘लॉ अँड ऑर्डर’ बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे.वाढदिवसाचा ‘शो-ऑफ’ या टोळक्याला चांगलाच महागात पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनोसा टाऊनमधील अवधूतनगर भागात काही तरुण हातात उघड्या तलवारी, चाकू आणि काठ्या घेऊन दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवरून मोठमोठ्याने ओरडत, घोषणाबाजी करत जात होते. अभय कैथवास नावाच्या एका तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही टोळी गजानन महाराज मंदिराच्या दिशेने निघाली होती. या टोळीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अचूक सापळा रचला आणि या तथाकथित ‘भाईंना’ रंगेहात दपले. यामध्ये अभय कैथवास (वय २२, रा. अवधूतनगर, बनोसा), मोहित राऊत (वय २१, रा. साईनगर, दर्यापूर), श्रीकांत डाळू (वय २०, रा. सुकळी, ता. दर्यापूर), अपूर्व लहाने (वय २२, रा. सांगळूदकरनगर, बनोसा), रीतेश पखान (वय २२, रा. सहयाोगनगर, बनोसा) आणि संचित मानकर (वय २२, रा. कास्तकारनगर, बनोसा) यांना अटक करण्यात आली असून, पोलीस आता यांच्या पळालेल्या इतर साथीदारांचा कसून शोध घेत आहेत.या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शहरातील शांतता भंग करणाऱ्या मद्यपी आणि ‘बुलेट राजांवरही’ कडक बडगा उगारला. रस्त्यावरून बुलेटचे फटाके फोडत सुसाट सुटणाऱ्या वाहनचालकांना पकडून थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांचे सायलेन्सर काढून त्यांना एकूण ६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या ४ चालकांवर गुन्हे दाखल करून १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, एसडीपीओ सतीश कुलकर्णी, पीआय अजित राठोड, एपीआय दांडगे, जमादार उमेश वाकपांजर, खडसे, कॉन्स्टेबल प्रदीप गणेशे, पवन पवार, चंद्रशेखर खंदार, नीलेश कवटकर, सचिन जाधव, ईश्वर चिस्तळकर, आशिष बैस व पुनसे यांच्या पथकाने केली असून यामुळे दर्यापुरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *