LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

सुपर हायवे की मृत्यूचा सापळा? फुलमोगरा ते भिलेवाडा बायपास बनला अपघातांचा ‘हॉटस्पॉट’

महिनाभरात १६ अपघात; २३ जखमी, तर ६ जणांची प्रकृती चिंताजनक | महामार्ग सुरक्षेचे वाजले तीन-तेरा
भंडारा :
भंडारा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बायपास मार्ग आता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. गुळगुळीत आणि चकचकीत रस्त्यांवरून सुसाट धावणारी वाहने आणि वेगावरील नियंत्रणाचा अभाव यामुळे नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील फुलमोगरा ते भिलेवाडा हा मार्ग अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. गत एकाच महिन्यात या मार्गावर तब्बल १६ भीषण अपघात घडले असून, त्यात २३ जण जखमी झाले आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सतत घडणाऱ्या या जीवघेण्या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ‘हे रोखणार कोण?’ असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित बांधकाम कंपनीने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या सहापदरी बायपासवर वाहनांच्या वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन केले जाते. काही ठिकाणी रस्त्याची रचना नागमोडी असून रात्रीच्या वेळी वळणे स्पष्ट दिसत नाहीत. तसेच, नियमाप्रमाणे आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा अभाव आणि अवजड वाहनांची सततची वाढती वर्दळ यामुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा प्रवास अधिक धोकादायक बनत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मदतीसाठी धावतात खासगी संस्था अपघातानंतर जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी यासाठी खासगी संस्थांनी मोलाचा वाटा उचलला आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेची सेवा येथे अखंडितपणे कार्यरत असून, जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम या माध्यमातून केले जात आहे.
काय आहेत नागरिकांच्या मागण्या?
या मार्गावर तातडीने स्पीड ब्रेकर, धोक्याची सूचना देणारे चेतावणी फलक (Warning Boards) आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच अवजड वाहनांसाठी स्वतंत्र लेन तयार करण्याचीही मागणी होत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ही बाब शक्य नसल्याचेही प्रशासकीय सूत्रांकडून म्हटले जात आहे.
■ सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे
फुलमोगरा ते भिलेवाडा मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ चारचाकी, ट्रक आणि टिप्परचे अपघात झाले आहेत. भरधाव वेगामुळे दुचाकी स्लीप होऊन ५ अपघात घडले, तर मागून धडक दिल्याने ३ जण गंभीर जखमी झाले. वेगात वाहन चालवणे, हेल्मेटचा अभाव, मोबाईलचा वापर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही या अपघातांची प्रमुख कारणे आहेत. विशेषतः भिलेवाडा वळण रस्ता आणि वैनगंगा नदीवरील उड्डाणपुलावर तब्बल ९ अपघातांची नोंद झाली आहे.
■ गतीरोधकांचा पेच; लावायचे तरी कसे?
न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक (स्पीड ब्रेकर) लावण्यास मनाई आहे. त्यामुळे या सुपर हायवेच्या निर्मितीवेळी कुठेही गतीरोधक तयार करण्यात आलेले नाहीत. मात्र, आता वाढत्या अपघातांना आळा घालायचा असेल, तर धोकादायक वळणे आणि अपघातप्रवण स्थळी विशेष चेतावणी फलकांसह सुरक्षित गतीरोधक किंवा रंबल स्ट्रीप्स (Rumble strips) लावणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *