लेकाच्या मृत्यूचा धक्का असह्य; मृतदेह पाहताच आईनेही सोडले प्राण
लाखांदूर तालुक्यातील खैरना येथील हृदयद्रावक घटना
माय-लेकावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार
लाखांदूर (भंडारा) : मुलाच्या निधनाची बातमी ऐकून घरी परतलेल्या वृद्ध मातेला पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहताच तीव्र मानसिक धक्का बसला. या असह्य धक्क्यातच आईनेही मुलाच्या मृतदेहाजवळच अखेरचा श्वास घेतल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील खैरना येथे घडली आहे. एकाच दिवशी माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, खैरना येथील रहिवासी हिरालाल विठोबा पचारे (वय ६०) यांना २४ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची तयारी केली, मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने पचारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती गावात आणि इतर नातेवाइकांना तातडीने देण्यात आली.
हिरालाल यांची ८० वर्षीय वृद्ध आई सारजा विठोबा पचारे या काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीकडे राहायला गेल्या होत्या. आपल्या मुलाच्या मृत्यूची दुःखद वार्ता समजताच त्या तातडीने खैरना येथे परतल्या. घरी पोहोचताच अंगणात ठेवलेला आपल्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. मुलाजवळ बसून त्या ढसाढसा रडत होत्या. याच प्रचंड आघातामुळे त्यांचीही प्रकृती अचानक खालावली आणि बघता बघता त्यांनीही मुलाच्या मृतदेहाजवळच प्राण सोडले.
■ एकाच वेळी निघाली माय-लेकाची अंत्ययात्रा
गावामध्ये मुलावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असतानाच आईनेही जगाचा निरोप घेतला. क्षणात घडलेल्या या अनपेक्षित घटनेने नातेवाईक व ग्रामस्थ सुन्न झाले. सारजा पचारे यांना हिरालाल यांच्यासह एकूण तीन मुले व दोन मुली असून सर्वजण विवाहित व स्वतंत्र राहत आहेत. या दुहेरी मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्मशानभूमीत ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अश्रूंच्या नयनांनी माय-लेकाच्या पार्थिवांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

