गरिबांचे घर आता केवळ २,५०० रुपयांत होणार प्रकाशमय!
महावितरणचा ‘स्मार्ट सोलर’ योजनेवर भर; वीज बिलाच्या समस्येतून मिळणार कायमची मुक्ती
भंडारा : केंद्र सरकारची ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि महावितरणच्या इतर व्यावसायिक सौर योजना राज्यभरात वेगाने राबवल्या जात आहेत. या पाठोपाठ आता महावितरण प्रशासनाने ‘स्मार्ट’ म्हणजेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप सोलर योजनेच्या प्रसिद्धी आणि अंमलबजावणीवर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मे महिना ‘सौर महिना’ म्हणून घोषित करण्यात आला असून, महावितरणचे अधिकारी या योजनेसाठी विशेष मोहीम राबवत आहेत.
दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलाच्या कटकटीतून कायमची मुक्ती मिळवून देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. एका किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प (सोलर प्लांट) उभारण्यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च येतो. यासाठी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’अंतर्गत ३० हजार रुपयांचे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारने आपली ‘स्मार्ट’ योजना जोडत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसाठी ३५ टक्के (१७,५०० रुपये) अतिरिक्त अनुदान जाहीर केले आहे.
परिणामी, केंद्र आणि राज्याचे एकूण ४७,५०० रुपयांचे अनुदान वजा जाता, बीपीएल ग्राहकांना हा सौर प्रकल्प उभारण्यासाठी स्वतःच्या खिशातून केवळ २,५०० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, अनुसूचित जाती आणि जमातीच्या (SC/ST) लाभार्थ्यांना ३० टक्के तर सर्वसाधारण प्रवर्गाला २० टक्के राज्य अनुदान मिळणार असल्याने, त्यांचा प्रत्यक्ष खर्च अनुक्रमे ५ ते १० हजार रुपयांच्या दरम्यान येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा घरगुती वीज ग्राहक असणे अनिवार्य आहे. त्याच्याकडे वैध वीज जोडणीसह छतावर पॅनेल बसवण्यासाठी पुरेशी मोकळी जागा असावी लागते. याव्यतिरिक्त, संबंधित ग्राहकाने यापूर्वी कोणत्याही सरकारी सौर योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि गेल्या १२ महिन्यांतील त्याचा सरासरी मासिक वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी असावा.
पाच वर्षांची मोफत वॉरंटी आणि अतिरिक्त कमाईची संधी
महावितरण ही या योजनेची मुख्य अंमलबजावणी यंत्रणा आहे. या प्रकल्पात पूर्णपणे भारतीय बनावटीच्या ‘आयईसी’ (IEC) प्रमाणित सोलर मॉड्यूल्सचा वापर केला जाणार आहे. पुरवठादार कंपनीकडून ग्राहकांना सलग ५ वर्षांसाठी मोफत देखभाल आणि दुरुस्तीची वॉरंटी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यास, ती अतिरिक्त वीज महावितरणला परत विकून ग्राहकांना जादा कमाई करण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध होणार आहे.
सध्या भंडारा परिमंडळात स्मार्ट योजनेअंतर्गत एकूण ८२५ ग्राहकांचे अर्ज प्रक्रियेत असून, या योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

