LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

 बिरसी शाळेच्या कायापालटासाठी एल.यु.खोब्रागडे यांचे मोलाचे योगदान : जि.प.सदस्या उके

बिरसी शाळेच्या प्रवेशव्दाराचे उद्घाटन
आमगाव :
आमगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिरसी ही शाळा जीर्ण अवस्थेत आली होती. शाळेचा जीर्णोद्धार करून तिला नवसंजीवनी देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गणेश लोहाडे यांनी पुढाकार घेत गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहकार्य गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षित निधी संकलित होऊ शकला नाही. दरम्यान शाळा समितीच्या पदाधिकार्‍यांनी शाळेचे माजी मुख्याध्यापक एल.यु.खोब्रागडे यांना योगदान देवून मदत करण्याची विनंती केली. खोब्रागडे यांनी लागलीच पुढाकार घेत शाळेच्या प्रवेशव्दारासाठी ४० हजाराची देणगी दिली. यातून भव्य प्रवेशव्दार साकार झाले आहे. शाळा जीर्णोव्दारासाठी एल.यु.खोब्रागडे यांचे योगदान बिरसी वायीयांच्या सदैव स्मरणात राहणार, असे प्रतिपादन जि.प.सदस्या छबुताई उके यांनी केले.

बिरसी शाळेच्या नवनिर्मित प्रवेशव्दाराचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रवेशव्दाराचे उद्घाटन पं.स.सभापती योगिताताई पुंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या छबुताई उके होत्या. कार्यक्रमाला दीपप्रज्वलक म्हणून माजी मुख्याध्यापक व दानदाता एल.यु.खोब्रागडे, विशेष अतिथी म्हणून पं.स.उपसभापती सुनंदाताई उके, कृउबासचे संचालक महेश उके, माजी सैनिक हेमंत बावनथडे, शिवसेना तालुका प्रमुख अनिल सोनकनवरे, केंद्रप्रमुख मधुकर राठोड, माजी केंद्रप्रमुख डी.एल.गुप्ता, माजी सरपंच पी.के.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे माजी मुख्याध्यापक एल.यू.खोब्रागडे यांनी ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ या म्हणीप्रमाणे आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेच्या प्रवेशद्वारासाठी ४० हजार रुपयांची देणगी दिली. तसेच रंगरंगोटीसाठी अतिरिक्त २ हजार रुपयांची मदत करून शाळेच्या कायापालटात मोलाचा वाटा उचलला. या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करून हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी माजी सैनिक हेमंत बावनथडे यांनीही आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवेशद्वारासाठी लोखंडी गेट तयार करण्याकरिता १५ हजार रुपयांची देणगी दिली. तसेच अनेक गावकर्‍यांनी आपल्या परीने आर्थिक व श्रमदान करून शाळेच्या कायापालटासाठी सहकार्य केले. कार्यक्रमात एल.यु.खोब्रागडे व हेमंत बावनथडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उपक्रमशील शिक्षिका वर्षाताई बावनथडे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका छाया तुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *