तिरोडा रेल्वे स्थानकावर लवकरच लागणार ‘कोच डिस्प्ले’ आणि ‘ट्रेन इंडिकेटर’ बोर्ड
रेल्वे प्रशासनाची अधिकृत मंजुरी
खा.प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नांना यश!
तिरोडा : तिरोडा रेल्वे स्थानकावरून प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच ‘कोच डिस्प्ले बोर्ड’ आणि ‘ट्रेन इंडिकेटर बोर्ड’ लावले जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने या महत्त्वपूर्ण कामाला आता अधिकृत मंजुरी दिली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
तिरोडा रेल्वे स्थानकावर ‘कोच डिस्प्ले’ आणि ‘ट्रेन इंडिकेटर’ बोर्ड लावण्यात यावे, याकरीता नागरिकांनी खा.पटेल यांच्याकडे मागणी केली. मागणीला घेवून खा.प्रफुल्ल पटेल यांनी ७ एप्रिल २०२६ रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून तिरोडा स्थानकावरील प्रवाशांची ही गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी केली होती. दरम्यान रेल्वे प्रशासनाने खा.पटेल यांच्या पत्राची गंभीर दखल घेत, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे डीआरएम दीपक कुमार गुप्ता यांनी यासंदर्भात लेखी दुजोरा दिला आहे.
तिरोडा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी कोच डिस्प्ले बोर्ड आणि ट्रेन इंडिकेटर बोर्ड लावण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यवाही वेगाने सुरू करण्यात आली आहे. सध्या तिरोडा रेल्वे स्थानकावर कोच पोझिशन (कोणता डबा कुठे येणार) आणि गाड्यांच्या येण्या-जाण्याची अचूक माहिती देणारे डिजिटल बोर्ड उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत होती. विशेषतः रात्रीच्या वेळी, तसेच वृद्ध आणि महिला प्रवाशांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. आता हे डिजिटल डिस्प्ले बोर्ड लागल्यामुळे प्रवाशांना आपल्या गाडीची वेळ आणि कोच शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
……..
प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
सध्या तिरोडा स्थानकावर कोचची स्थिती (कोणता डबा कुठे येणार) आणि गाड्यांच्या येण्या-जाण्याची अचूक माहिती देणारे डिजिटल बोर्ड उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्यांची मोठी धांदल उडत होती. आता डिजिटल डिस्प्ले बोर्ड लागल्यामुळे प्रवाशांना आपल्या ट्रेनची अचूक स्थिती आणि डबा शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या या यशस्वी प्रयत्नांबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी मोठा आनंद व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

