रेल्वे स्थानकावर १६ गाड्यांची तपासणी; ५४५ प्रकरणांत २.६४ लाखांचा दंड वसूल
गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातर्फे प्रवाशांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष ‘नाका तिकीट चेकिंग मोहीम’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २२ मे २०२६ रोजी गोंदिया रेल्वे स्थानकावर धडक कारवाई करत १६ गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. यात रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५४५ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण २ लाख ६४ हजार ५१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांच्या निर्देशानुसार २१ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत ही विशेष जनजागृती आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे. याच साखळीत गोंदिया स्थानकावर सघन तपासणी करण्यात आली.
दोन्ही मंडळ वाणिज्य व्यवस्थापक पी. बी. राव आणि अनिल एल. बागले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या विशेष पथकात २ मुख्य तिकीट निरीक्षक, ३६ तिकीट तपासणी कर्मचारी, २ एमटीएस कर्मचारी आणि २ आरपीएफ जवानांचा समावेश होता. या संयुक्त पथकाने स्टेशनवरून जाणाऱ्या एकूण १६ गाड्यांची तपासणी केली.प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि शिस्तबद्ध प्रवासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी अशा प्रकारच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमा यापुढेही राबविल्या जातील, अशी माहिती वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांनी दिली.
कारवाईचा सविस्तर तपशील:
या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत विनातिकीट, अनियमित तिकीट आणि रेल्वे कायद्याच्या इतर उल्लंघनाचे एकूण ५४५ गुन्हे नोंदविण्यात आले:
विनातिकीट प्रवास: २३६ प्रकरणे (दंड: १,४३,५७० रुपये)
अनियमित प्रवास: २३७ प्रकरणे (दंड: १,१३,५४० रुपये)
विना-नोंदणीकृत सामान/इतर: ६६ प्रकरणे (दंड: ६,६०० रुपये)
अस्वच्छता/कचरा पसरवणे: ४ प्रकरणे (दंड: ४०० रुपये)
धूम्रपान बंदीचे उल्लंघन: २ प्रकरणे (दंड: ४०० रुपये)
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी योग्य तिकीट आवर्जून काढावे आणि स्थानक परिसरात प्रवेश करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे. तसेच रेल्वेगाड्या आणि रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. कचरा पसरवणे आणि धूम्रपानासारख्या बेकायदेशीर कृती टाळाव्यात. रेल्वे ही राष्ट्राची महत्त्वाची सार्वजनिक संपत्ती असून तिचे रक्षण आणि स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

