ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर नगरपंचायतीचे अनधिकृत अतिक्रमण
वैद्यकीय अधीक्षकांचा मुख्याधिकाऱ्यांना फौजदारी कारवाईचा इशारा!
■ १०० खाटांच्या श्रेणीवर्धनाला खोडा बसण्याची भीती
■ देवरी प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ
देवरी (गोंदिया ) : येथील नगरपंचायत आणि ग्रामीण रुग्णालय प्रशासनामध्ये जागेच्या अतिक्रमणावरून मोठा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नगरपंचायतीकडून सुरू असलेले व्यापारी संकुलाचे (गाळे) बांधकाम हे पूर्णपणे अवैध आणि अनधिकृत असल्याचा थेट आरोप रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे. हे बांधकाम तात्काळ न थांबविल्यास नगरविकास विभाग व पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करू, असा थेट इशारा देणारे पत्र रुग्णालय प्रशासनाने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना बजावल्याने देवरी प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्रामीण रुग्णालय देवरी येथील मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या रुग्णालयीन परिसरात नगरपंचायतीच्या वतीने व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी २६ सप्टेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे रुग्णालय प्रशासनाने सदर ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये, असे नगरपंचायतीला स्पष्ट केले होते. असे असतानाही, नगरपंचायत प्रशासनाने रुग्णालय व्यवस्थापनाला कोणतीही पूर्वसूचना न देता, रात्रीत मोठमोठे खड्डे खोदून बांधकामाला सुरुवात केली आहे.
शासकीय जागेवर थेट अतिक्रमण
महाराष्ट्र शासनाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता केले जाणारे हे बांधकाम म्हणजे थेट शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने पत्रात केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हे अवैध बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरपंचायतीकडे या बांधकामाची शासकीय मंजुरी असल्यास ती तात्काळ सादर करावी, अन्यथा थेट फौजदारी कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पत्रात देण्यात आला आहे.
वरिष्ठांचे लक्ष वेधले
रुग्णालय प्रशासनाने केवळ मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन न थांबता, या पत्राच्या प्रती गोंदियाचे जिल्हाधिकारी, आरोग्य सेवा उपसंचालक (नागपूर), उपविभागीय अधिकारी (महसूल), जिल्हा शल्यचिकित्सक आणि देवरीचे पोलीस निरीक्षक यांनाही माहिती व तातडीच्या कार्यवाहीसाठी पाठवल्या आहेत. त्यामुळे आता नगरपंचायत यावर काय भूमिका घेते आणि वरिष्ठ अधिकारी यावर कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण देवरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
📌 आरोग्य सेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता
देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, या रुग्णालयाचे १०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. भविष्यात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि नवीन इमारतीसाठी रुग्णालयाला या जागेची अत्यंत गरज भासणार आहे.
मात्र, नगरपंचायतीने येथे व्यापारी गाळे बांधल्यास रुग्णालयाला भविष्यातील विस्तारासाठी जागा अपुरी पडेल आणि लोककल्याणाच्या या महत्त्वाच्या कामात मोठा अडथळा निर्माण होईल, अशी रास्त भीती वैद्यकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

