LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

कोटेश्वर येथे वर्धा नदीत बुडून सहा वर्षीय चिमुकलीचा करुण अंत; १२ वर्षांच्या नवसाचे फळ काळाने हिरावले

देवस्थानच्या भोंगळ कारभारावर संताप; पायऱ्यांवर शेवाळ साचल्याने घडला अनर्थ
भिडी (वर्धा):
अधिक मासानिमित्त श्री क्षेत्र कोटेश्वर येथे वडिलांसह पवित्र स्नानासाठी आलेल्या एका सहा वर्षीय चिमुरडीचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. भक्ती विनोद तावडे (रा. वर्धा) असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, देवस्थान समितीच्या निष्काळजीपणावर भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटेश्वर येथे वर्धा नदी उत्तर वाहिनी असल्याने या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या अधिक महिना सुरू असल्याने येथे स्नानासाठी व पूजेसाठी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने शुक्रवारी वर्धा येथील रहिवासी विनोद तावडे हे आपल्या कुटुंबासह स्नानासाठी आले होते. ते आपली सहा वर्षीय मुलगी भक्ती हिला घेऊन नदीत अंघोळीसाठी उतरले. मात्र, नदी पात्रातील सिमेंट पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पायऱ्यांवरून पाय घसरल्याने बाप-लेक खोल पाण्यात कोसळले.
यावेळी भक्तीचा हात सुटून ती वडिलांपासून दूर गेली आणि पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. विनोद यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यावर उपस्थित नागरिकांनी तात्काळ नदीत उड्या घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, चिमुकल्या भक्तीला वाचवण्यात अपयश आले. काही वेळाने पोहणाऱ्यांना तिचा मृतदेहच हाती लागला. तिला तात्काळ भीडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.
१२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेली चिमुकली गमावली
वर्धा येथील धार्मिक प्रवृत्तीच्या तावडे दाम्पत्याला तब्बल १२ वर्षे अपत्यप्राप्ती झाली नव्हती. अनेक नवस आणि प्रार्थनांनंतर भक्तीच्या रूपाने त्यांच्या पोटी कन्येचा जन्म झाला होता. अवघ्या सहाव्या वर्षीच काळाने तिला हिरावून नेल्याने तावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नियतीच्या या क्रूर खेळाने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
देवस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आणि नागरिकांचा रोष
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटेश्वर येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, नदीच्या पायऱ्यांवर साचलेले शेवाळ काढण्याची तसदी देवस्थान समितीने घेतली नाही. पायरीखालील पाण्याचा अंदाज येत नसल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स लावणे अत्यंत गरजेचे असताना त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच आतापर्यंत १० ते १५ भाविक पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
धरण प्रशासनाने पाणी मोकळे करण्याची मागणी
सध्या खर्डा येथील धरणाचे दरवाजे बंद असल्याने कोटेश्वर येथील नदी पात्रात पाणी स्तब्ध आहे. त्यामुळे पायरीखालील पाण्याचा नेमका अंदाज भाविकांना येत नाही. भविष्यात अशा भीषण दुर्घटना टाळण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडून पाणी मोकळे करावे, जेणेकरून नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होईल आणि जीवितहानी टळेल, अशी आग्रही मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दबक्या आवाजात दिला जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *