LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई: माओवाद्यांचा छुपा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त

‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत मोठे यश; नक्षल सप्ताहातील घातपाताचा कट उधळला
गडचिरोली ( प्रतिनिधी ) :
गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेला शस्त्रास्त्रे निर्मितीचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. नक्षल सप्ताह आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवून आणण्याच्या उद्देशाने जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक आणि तांत्रिक साहित्य पोलिसांनी शोधून काढत घटनास्थळीच नष्ट केले आहे. यामुळे माओवाद्यांचा मोठा कट उधळला गेला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नक्षलवादाचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने सध्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक १६ मे २०२६ रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान, पोमकें-बिनागुंडा हद्दीतील घनदाट जंगल परिसरात माओवाद्यांनी शस्त्रनिर्मितीचे साहित्य आणि इतर स्फोटके गुप्तपणे लपवून ठेवल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली.

या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मे २०२६ रोजी विशेष अभियान पथक, ‘प्राणहिता’च्या संयुक्त सहा तुकड्या आणि बीडीडीएसच्या (BDDS) दोन तुकड्या तातडीने शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आल्या. २२ मे रोजी जवानांनी पोमकें-बिनागुंडाच्या उत्तरेकडील जंगल परिसराला घेराव घालत कसून शोध मोहीम (Combing Operation) राबवली.
या शोध मोहिमेत बीडीडीएसच्या जवानांना जमिनीखाली अत्यंत चलाखीने पुरून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जिग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल आणि २० फुटांचा फुटबॉल पाईप आदी साहित्याचा समावेश होता. हे सर्व साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळीच सुरक्षितपणे नष्ट केले.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता व बीडीडीएसच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली. या महत्त्वपूर्ण आणि धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व जवानांचे विशेष कौतुक केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *