LatestNewsविदर्भ

सावली तालुक्यात हत्तींचा मुक्काम कायम, वनविभागाची डोकेदुखी वाढली!

हरांबा-उमरी जंगलात ३० हत्तींचे ‘डेरेदाखल’; उंटांचा ‘फ्लॉप शो’, वनविभागाचा अनोखा प्रयोग फसला!
मानव-वन्यजीव संघर्षाची भीती; संवेदनशील गावांना सतर्कतेचा इशारा, वनविभागाचे विशेष पथक तैनात
सावली (चंद्रपूर) :
तालुक्यातील हरांबा-उमरी जंगल व तलाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून ३० हत्तींच्या कळपाने ठिय्या मांडला आहे. या हत्तींना हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने उंटांचा वापर करून केलेला एक अनोखा प्रयोग साफ फसला असून, हत्तींनी या परिसरातून हलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. घनदाट जंगल, पाण्याचा मोठा साठा आणि मुबलक नैसर्गिक खाद्य यामुळे हा परिसर हत्तींसाठी जणू ‘सुरक्षित घर’ बनला आहे. हत्तींच्या या दीर्घ मुक्कामामुळे वनविभागाच्या चिंतेत प्रचंड भर पडली असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हरांबा-उमरीच्या जंगलातून हत्तींना दुसऱ्या वनपरिक्षेत्राकडे वळवण्यासाठी वनविभागाने राजस्थानमधून उंट मागवून एक वेगळाच प्रयोग करून पाहिला. उंटांना पाहून हत्ती घाबरतील आणि परिसर सोडतील, असा कयास वनाधिकाऱ्यांचा होता. मात्र, निसर्गाच्या या अथांग साम्राज्यात मुबलक अन्न-पाणी मिळत असताना हत्तींनी जागा बदलण्यास अजिबात रस दाखवला नाही. परिणामी, वनविभागाचा हा ‘उंटावरून हत्ती हाकलण्याचा’ अजब प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरल्याची माहिती समोर आली आहे.
बळजबरीने हाकलण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नकार
मिळालेल्या माहितीनुसार, वन्यजीव संरक्षणाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हत्तींच्या नैसर्गिक हालचालींमध्ये बळजबरीने मानवी हस्तक्षेप करणे किंवा त्यांना हुसकावणे योग्य नाही. हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरू द्यावे, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता वनविभागाने हत्तींना जबरदस्तीने हाकलण्याचा नाद सोडून दिला असून, केवळ त्यांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवण्यावर भर दिला आहे.
………………..
मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
हत्तींचा कळप दीर्घकाळ एकाच भागात राहिल्यास शेती पिकांचे अतोनात नुकसान होण्याची आणि हत्ती मानवी वस्तीकडे वळण्याची दाट शक्यता असते. संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाचे विशेष पथक २४ तास हत्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. जंगलाला लागून असलेल्या संवेदनशील गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना हत्तींपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज गावात तळ ठोकून आहे.
……………………
अफवांवर विश्वास ठेवू नका! “हरांबा-उमरी परिसरात हत्तींच्या मुक्कामामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीती दोन्ही आहे. वनविभाग परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहे. ग्रामस्थांनी जंगलाच्या दिशेने जाणे टाळावे आणि हत्तींबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” – वनविभाग प्रशासन, सावली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *