Bhandara News; विशेष महसुल सप्ताहामध्ये सामान्य नागरिकांची कामे पारदर्शक आणि तातडीने पूर्ण करा : महसूलमंत्री बावनकुळे
जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल दिन साजरा
भंडारा : विशेष महसूल सप्ताहादरम्यान सामान्य नागरिकांची कामे पारदर्शक आणि तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे महसूल दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधान परिषद सदस्य परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक नुरूल हसन, माजी खासदार सुनील मेंढे, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके-ढेंगे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे यांनी, राज्यभरात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष महसूल सप्ताहाबाबत माहिती दिली. “या सप्ताहामध्ये सामान्य नागरिकांची कामे पारदर्शक आणि तातडीने पूर्ण करणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. जात वैधता प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी व अन्य स्तरावरील दाखले, तसेच तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर महसूलसंबंधी कामे कोणतीही दिरंगाई न करता पार पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी, गोसेखुर्द प्रकल्पाच्या अंतर्गत गणेशपूर व पिंडकेपार या गावांतील बाधित नागरिकांचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. “या नागरिकांना योग्य मोबदला त्वरित मिळावा, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी कार्यवाही करावी,” असेही ते म्हणाले. रेती वाहतुकीसंदर्भात काही पैसे मागितल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत, बावनकुळे यांनी याकडे पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष वेधले. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
……………………..
अनुकंपा भरती आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याचे आदेश
श्री बावनकुळे यांनी अनुकंपा तत्वावर भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यास सांगितले, जेणेकरून संबंधित कुटुंबातील व्यक्तींना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. भूमी अभिलेख कार्यालयातील रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा तक्रारींवर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी महसूलमंत्री बावनकुळे यांनी, उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, विशेष महसूल सप्ताहाच्या काळात नागरिकांची जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत. त्यांनी नागरिकांना सेवा देण्यात दिरंगाई किंवा दुर्लक्ष केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला.