LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

शहरी व ग्रामीण भागातील झुडपी जंगलाच्या जागेवरील अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देणे हेच माझे उद्दिष्ट – आमदार विनोद अग्रवाल

▪️ एसडीओ, तहसीलदार, बीडीओ, सीओ, तलाठी आणि ग्रामसेवकांना माहिती संकलित करून वनविभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश
गोंदिया :
गोंदिया शहर आणि ग्रामीण भागात वनविभागाच्या झुडपी जंगलाच्या जागेवर १९९६ पूर्वीपासून वास्तव्य करत असलेल्या अतिक्रमणधारकांना जमिनीचा कायमस्वरूपी मालकी हक्क (पट्टे) मिळवून देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.
उल्लेखनीय आहे की, यापूर्वी शासकीय जागेवर वास्तव्य करणाऱ्या ग्रामीण भागातील सुमारे ४ हजार २०० पेक्षा जास्त नागरिकांना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे वितरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाले होते. आता आमदार अग्रवाल यांनी झुडपी जंगलाच्या जागेवर राहणाऱ्या सुमारे १० हजार अतिक्रमणधारक शहरी आणि ग्रामीण जनतेला न्याय मिळवून देण्याचा संकल्प केला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने माहिती एकत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकाऱ्यांना दिले महत्त्वपूर्ण निर्देश:
आमदार विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO), नगर परिषदेचे मुख्याधिकारी (CO), तलाठी आणि ग्रामसेवक यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागात झुडपी जंगलाच्या जागेवर १९९६ पूर्वीपासून राहणाऱ्या नागरिकांची सविस्तर माहिती गोळा करावी. तसेच, याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो तात्काळ वनविभागाकडे सादर करावा. जेवढे अतिक्रमणधारक १९९६ पूर्वीचे सिद्ध होतील, त्या सर्वांचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना मालकी हक्क देण्यासाठी अतिशीघ्र कार्यवाही केली जाईल, असेही प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
एकही व्यक्ती अधिकारापासून वंचित राहणार नाही:
या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, “१९९६ पूर्वीपासून झुडपी जंगलाच्या जागेवर राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. पिढ्यानपिढ्या तिथे वास्तव्य करणारा एकही नागरिक आपल्या जमिनीच्या कायदेशीर अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी माझा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *