जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी; प्रधानमंत्री आवास योजनेत गोंदिया सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम
गोंदिया : (विशेष प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. महा आवास अभियान २०२३-२४ अंतर्गत जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, या योजनेत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याला सलग चौथ्यांदा मिळत असून, जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.
या दैदीप्यमान यशाचा गौरव करण्यासाठी येत्या १५ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्री यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, यावेळी गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. जिल्ह्याने मिळवलेल्या या यशात जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा मोठा वाटा आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांना निमंत्रित केले आहे.
जिल्हा स्तरावर गोंदियाने प्रथम क्रमांक मिळवला असतानाच, विभागीय स्तरावरही नागपूर विभागाने आपली छाप सोडली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत कोकण आणि नाशिक नंतर नागपूर विभागाने राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर विभाग राज्यात प्रथम ठरला आहे. सलग चौथ्या वर्षी मिळालेल्या या ऐतिहासिक यशामुळे गोंदिया जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात गाजत असून, या कामगिरीबद्दल प्रशासकीय वर्तुळातून आणि सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
■ चौकट ■
सर्वांच्या अथक परिश्रमाची पावती!
“प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत गोंदिया जिल्ह्याला सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे, हा शासनाचा संकल्प असून तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, ग्रामपंचायती, ग्रामीण विकास यंत्रणा तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत समर्पणाने काम केले. महा आवास अभियान २०२३-२४ मध्ये मिळालेला हा सन्मान केवळ पुरस्कार नसून ग्रामीण विकासाच्या दिशेने गोंदिया जिल्ह्याने केलेल्या प्रभावी कामाची राज्यस्तरीय पावती आहे. भविष्यातही ही यशाची परंपरा कायम राखण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू. गोंदिया जिल्ह्याच्या वतीने या अभियानात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो.”
– लायकराम भेंडारकर (अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया)

