LatestNewsगोंदियाविदर्भ

४ दिवस, ३ हल्ले आणि १ बळी! अर्जुनी मोरगावात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला; जंगलालगतच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण
अर्जुनी-मोरगाव (गोंदिया ) :
अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मागील अवघ्या चार दिवसांत हल्ल्याची तिसरी गंभीर घटना समोर आली आहे. भरनोली जंगल परिसरात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका मजुरावर अस्वलाने अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आज, १२ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सलग घडणाऱ्या या जीवघेण्या घटनांमुळे संपूर्ण तालुका हादरला असून, जंगलालगतच्या गावांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक रतिराम गावळे (वय ४०, रा. भरनोली) हे परिसरातील इतर मजुरांसोबत नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेले होते. तीरखुरी सहवण क्षेत्र भाग क्रमांक एक अंतर्गत नियत क्षेत्र क्रमांक तीनमध्ये (भरनोली जंगल परिसर) तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू होते. त्यावेळी घनदाट जंगलातून अचानक एक अस्वल बाहेर आले आणि त्याने थेट दीपक गावळे यांच्यावर हल्ला चढवला. अस्वलाने त्यांच्या मांडीवर व शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा केल्या.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, सोबतच्या मजुरांनी प्रसंगावधान राखून तात्काळ आरडाओरडा सुरू केला आणि मदतीसाठी धाव घेतली. मजुरांच्या या आरडाओरडीमुळे अस्वल घाबरून जंगलाच्या दिशेने पसार झाले व सुदैवाने दीपक यांचा जीव वाचला. यानंतर जखमी अवस्थेतील दीपक गावळे यांना जंगलाबाहेर आणून तातडीने केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
चार दिवसांत एकाचा बळी, दोन गंभीर जखमी
तालुक्यात मागील चार दिवसांपासून वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिली घटना ९ मे रोजी जांभळी गंधारी जंगल परिसरात घडली होती. येथे तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या सुनीता हटवार या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यावर नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या घटनेत मौजा वडेगाव बंध्या येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला कौशल्या रहाटे यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन घटनांची भीती ताजी असतानाच आता अस्वलाच्या हल्ल्याची तिसरी घटना घडल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
वनविभागाचे आवाहन
घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्याने मजुरांचा जंगलातील वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “जंगलात जाताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, एकटे जंगलात जाऊ नये आणि वन्य प्राण्यांचा वावर दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे,” असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासन आता या वाढत्या हल्ल्यांवर काय उपाययोजना करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *