LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

नगरपंचायतीचे १४ आरो प्लांट ‘सलाईनवर’; ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

▪️ १८ पैकी केवळ ४ प्लांट सुरू; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सडक अर्जुनी (गोंदिया ) :
सध्या उन्हाळ्याचा पारा प्रचंड वाढला असून नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. अशातच सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना शुद्ध व थंड पाण्यापासून मुकावे लागत आहे. शहरातील जनतेसाठी बसवण्यात आलेले १८ पैकी तब्बल १४ आरो (RO) प्लांट सध्या नादुरुस्त अवस्थेत (सलाईनवर) आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना साध्या आणि गरम पाण्यावरच तहान भागवावी लागत असून, प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील नागरिकांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे, या उद्देशाने नगरपंचायतीने १७ वॉर्डांमध्ये १८ ठिकाणी आरो प्लांट उभारले आहेत. मात्र, यापैकी केवळ ४ प्लांटच्या माध्यमातून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरित १४ प्लांटमधील मशीन खराब झाल्यामुळे पाणी थंड होणे बंद झाले आहे. सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे दररोज आजूबाजूच्या गावांतून नागरिक शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँक, शाळा, तहसील कार्यालय, पंचायत समिती, दवाखाना, महाविद्यालय, महावितरण कार्यालय आदी ठिकाणी कामानिमित्त येतात. मात्र, बाहेरगावाहून आलेल्या या नागरिकांना नादुरुस्त आरो प्लांटमुळे गरम पाणी पिऊनच समाधान मानावे लागत आहे. नगरपंचायतीच्या या कारभारामुळे “नाव सोनाबाई, हाती कथलाचा वाडा” अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
वॉर्ड क्रमांक १७ मध्ये प्लांटच नाही
एकीकडे १४ प्लांट बंद आहेत, तर दुसरीकडे वॉर्ड क्रमांक १७ मध्ये अद्याप आरो प्लांट लावण्यातच आलेला नाही. त्यामुळे या वॉर्डातील नागरिकांना थंड पाण्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. येथे तातडीने नवीन आरो प्लांट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाणी टंचाई आणि अपुरे मनुष्यबळ
सडक अर्जुनी शहरात सुमारे १९५० कुटुंबे वास्तव्यास असून, ३०८७ पुरुष व २८८८ महिला असे नागरिक येथे राहतात. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील वॉर्ड क्रमांक ५, ११ आणि १६ मध्ये पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या वॉर्डांमध्ये थेट टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी नगरपंचायतीच्या केवळ दोन कर्मचाऱ्यांवर आहे.
देखभाल दुरुस्तीअभावी प्लांटची दुर्दशा
अनेक आरो प्लांट जुने झाल्यामुळे त्यांना गळती लागली असून पाणी वाया जात आहे. तर काहींचे मशीन पूर्णपणे खराब झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या यंत्रणेकडे जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. थंड व शुद्ध पाणी न मिळाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन हे १४ आरो प्लांट दुरुस्त करावेत, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
………………………………………………………
बंद आरो प्लांट टप्प्याटप्प्याने सुरू करणार
“शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले आरो प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. इतर वॉर्डातील आरो प्लांट देखील टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा आमचा मानस आहे. सडक अर्जुनी नगरात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना व स्थानिकांना शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी बंद असलेले जलशुद्धीकरण यंत्र तातडीने सुरू करणार आहोत.”

  • सारंग खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत सडक अर्जुनी.
Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *