LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

राष्ट्रीय लोक अदालतीचे घवघवीत यश: एकाच दिवसात १३,६५५ प्रकरणांचा निपटारा

तब्बल ३ कोटी ६९ लाखांहून अधिक रकमेची वसुली; सामोपचाराने मिटले अनेक वर्षांचे वाद, पक्षकारांना मोठा दिलासा
गोंदिया (विशेष प्रतिनिधी):
न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले खटले आणि पूर्व-न्यायप्रविष्ट प्रकरणे सामंजस्याने व तात्काळ निकाली काढण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात शनिवारी, ९ मे रोजी आयोजित दुसऱ्या ‘राष्ट्रीय लोक अदालती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोक अदालतीत तब्बल १३ हजार ६५५ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, याद्वारे ३ कोटी ६९ लाख ७८ हजार ६०५ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेले वाद एकाच दिवसात सामोपचाराने मिटल्याने हजारो पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष मा. श्री. ए. एस. प्रतिनिधी आणि सचिव श्री. एन. के. वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही अदालत पार पडली. लोक अदालतीचे उद्घाटन मा. श्री. ए. एस. प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, गोंदिया जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील वर्ग आणि पक्षकार उपस्थित होते. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना मा. श्री. ए. एस. प्रतिनिधी यांनी लोक अदालतीचे फायदे समजावून सांगताना, यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कसा वाचतो हे विशद केले. तसेच सचिव श्री. एन. के. वाळके यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन केले.

या अदालतीमध्ये तडजोड पात्र न्याय प्रविष्ट आणि पूर्व-न्यायप्रविष्ट अशी एकूण ५३ हजार ३०७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित असलेली ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली व १ कोटी ९८ लाख ४७ हजार ७१४ रुपयांची वसुली झाली. पूर्व-न्यायप्रविष्ट ४८ हजार ७४५ प्रकरणांपैकी १३ हजार ५४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यातून १ कोटी ७१ लाख ३० हजार ८९१ रुपये वसूल झाले. अशाप्रकारे एकूण १३ हजार ६५५ प्रकरणे निकाली निघून एकूण ३ कोटी ६९ लाख ७८ हजार ६०५ रुपयांची वसुली झाली. याशिवाय, स्पेशल ड्राईव्हअंतर्गत न्यायालयांमध्ये ठेवण्यात आलेल्या ११२ फौजदारी प्रकरणांपैकी ९५ प्रकरणे निकाली निघाली. तसेच, ‘प्लीड गिल्टी’ (पेट्टी प्रकरणे) अंतर्गत ठेवलेल्या १३८४ प्रकरणांपैकी ८९३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणाऱ्या मानसिक व आर्थिक त्रासातून सुटका मिळाली.

लोक अदालतीचे महत्त्व
“लोक अदालतीत दोन्ही बाजूंच्या सहमतीने निर्णय घेतला जातो, त्यामुळे येथे कुणाचाही विजय किंवा पराभव होत नाही. नात्यांमधील दुरावा मिटवून सलोखा निर्माण करण्याचे हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी दाखवलेला प्रतिसाद हा न्यायव्यवस्थेवरील त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे,” अशी भावना यावेळी कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली.

या लोक अदालतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महावितरण, पाणीपुरवठा, टेलिफोन आणि बँकांच्या पूर्व-न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये पक्षकारांनी तडजोडीअंती थकबाकीची पूर्ण रक्कम जमा केल्याने त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधित विभाग आणि थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला आहे. प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायाधीश, जिल्हा वकील संघ आणि पॅनेलवरील वकील अॅड. मयंक गुप्ता, अॅड. कुणाल गणवीर, अड. दिव्या डहाके, अड. सुचना चवरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच, या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. ए. आर. कुकडे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, बेलिफ, शिपाई आणि पॅरा-लिगल व्हॉलंटियर्स यांनी अथक परिश्रम घेतले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *