गोंदिया पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन दुचाकींसह सराईत चोरटा जेरबंद
गोंदिया शहर व गंगाझरी येथील चोरीच्या गुन्ह्यांचा उकल; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया | नवचैतन्य
स्थानिक के.टी.एस. रुग्णालयाच्या परिसरातून चोरीला गेलेल्या मोटार सायकलचा शोध घेताना गोंदिया शहर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीची ज्युपीटर आणि ३० हजार रुपये किमतीची एच.एफ. डीलक्स अशा एकूण दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे गोंदिया शहर आणि गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या दोन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन ओमकारलाल धाकड (रा. होस्टेल, गंगाबाई रुग्णालय) यांची ज्युपीटर मोटार सायकल (क्र. RJ 09/NS-3423) १ मे २०२६ रोजी रात्री के.टी.एस. रुग्णालयासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी ३ मे रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीवरून आरोपीला बेड्या
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे फिरवली. गस्तीवर असताना पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, आसोली येथील सुरेश भिवा नेवारे याने ही चोरी केली आहे. पोलिसांनी संशयावरून सुरेशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.
दोन गुन्ह्यांची कबुली
आरोपी सुरेश नेवारे (३६ वर्षे) याने केवळ पवन धाकड यांचीच गाडी नव्हे, तर गंगाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतूनही एक एच.एफ. डीलक्स गाडी (क्र. MH 35/AL 0361) चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून दोन्ही वाहने (एकूण किंमत १,१०,०००/- रुपये) जप्त केली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सफौ कवलपालसिंग भाटीया, पोहवा सतिश शेंडे, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, दिपक राहांगडाले आणि डी.बी. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

