पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सुटणार; गोंदिया शहरवासीयांना मोठा दिलासा!
गोंदिया | नवचैतन्य वृत्त
उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे गोंदिया शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विनंतीवरून पाटबंधारे विभागाने पुजारीटोला प्रकल्पातून ५ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, शनिवारपासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
गोंदिया शहर, कुडवा आणि कटंगी या भागांना डांगोर्ली येथील वैनगंगा नदी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नदीतील पाणी आटल्याने पाणीपुरवठा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मध्यंतरी नदी पात्रात कच्चे बंधारे बांधून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तीव्र उन्हामुळे ते पाणी केवळ चार-पाच दिवस पुरण्याइतपतच शिल्लक राहिले होते.
नदीतील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे अखेर पुजारीटोला प्रकल्पावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाने शनिवार, २ मे रोजी पुजारीटोला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची तयारी पूर्ण केली आहे. हे पाणी कालव्याद्वारे वैनगंगा नदीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर नदीतील पाणी पातळी वाढल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पाणीटंचाई लक्षात घेता दरवर्षी पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित ठेवले जाते. त्यापैकी ५ दलघमी पाणी सोडण्याची मागणी सध्या करण्यात आली आहे. दरम्यान, पाणी पात्रात पोहोचेपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन प्राधिकरणाचे अभियंता प्रदीप ताजने यांनी केले आहे.

