HealthLatestगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

मोबाईलवर अचानक वाजला आपत्कालीन सायरन; ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट’ प्रणाली देशभरात लाँच

आपत्ती काळात नागरिकांना मिळणार पूर्वसूचना
नवी दिल्ली:
शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास देशभरातील कोट्यवधी मोबाईल फोनवर अचानक एक भीतिदायक सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. अचानक आलेल्या या आवाजा मुळे आणि मोबाईल स्क्रीनवर झळकलेल्या ‘एक्सस्ट्रिमली सिव्हिअर अलर्ट’ या संदेशामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. आपला फोन हॅक झाला की काय किंवा बँकेतील पैसे हॅकरने गायब केले की काय, अशा भीतिदायक शंका नागरिकांच्या मनात आल्या. मात्र, हा सायरन म्हणजे केंद्र सरकारने अधिकृतपणे लाँच केलेली ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी या अत्याधुनिक प्रणालीचे देशभरात अधिकृतपणे उद्घाटन केले.
या प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या भागातील आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींबाबत त्वरित पूर्वसूचना मिळणार आहे. ही प्रणाली कार्यान्वित होताच शनिवारी देशभरातील कोट्यवधी मोबाईल फोनवर चाचणीचे संदेश पाठवण्यात आले. लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून दूरसंचार विभागाने २९ एप्रिल रोजीच या चाचणीबाबत नागरिकांना सूचित केले होते आणि या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते. मात्र, प्रत्यक्ष सायरन वाजताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. नागरिक एकमेकांना फोन करून या अलर्टबाबत विचारणा करताना दिसले.
‘सेल ब्रॉडकास्ट’ हे भारत सरकारचे एक महत्त्वाचे आपत्कालीन तंत्रज्ञान असून ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी विकसित करण्यात आले आहे. या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही स्वतंत्र अ‍ॅपची गरज नाही. मोबाईल सायलेंट मोडवर असला तरीही हा अलर्टचा आवाज मोठ्याने ऐकू येतो. ही प्रणाली ‘सी-डॉट’ (C-DOT) ने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने आणि केंद्रीय गृहखात्याच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केली आहे. भविष्यात पूर, भूकंप किंवा चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
……………………….
सेल ब्रॉडकास्ट’ तंत्रज्ञान म्हणजे काय ? भारत सरकारची आपत्कालीन मोबाइल अलर्ट प्रणाली नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पायरी आहे. ही प्रणाली कोणत्याही अॅपशिवाय थेट प्रत्येक मोबाइलवर सूचना पोहोचवते. मोबाइल सायलेंट असला तरी अलर्टचा आवाज ऐकू येतो. सर्व नैसर्गिक आपत्तीत इशारा देऊन नागरिकांचे जीव वाचवता येतात.

वैशिष्ट्ये आणि विकास स्वदेशी तंत्रज्ञान : ही प्रणाली ‘सी-डॉट’ ने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने आणि केंद्रीय गृहखात्याच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे.तातडीची माहिती : याद्वारे आपत्ती, आणीबाणी आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती काही सेकंदात नागरिकांच्या मोबाइलवर पोहोचवली जाईल.
आंतरराष्ट्रीय दर्जा : ही प्रणाली संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन’ने शिफारस केलेल्या ‘कॉमन अलटिंग प्रोटोकॉल’वर आधारित आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *