LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

घुग्घुसमध्ये एफडीएचा धडक छापा: लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त! दोन वेगवेगळ्या कारव्हायांमध्ये दोघांवर गुन्हे दाखल

घुग्घुस / सिंदेवाही (प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस आणि सिंदेवाही परिसरामध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आणि पोलिसांनी गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. घुग्घुस येथे गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आणि निकोटीनयुक्त पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन (नागपूर विभाग) च्या अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निवासी आणि व्यावसायिक संकुलावर अचानक छापा टाकला. बुधवार दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान, नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाला गोण्यांमध्ये (बोरियांमध्ये) दडवून ठेवलेला आढळला. कोणतीही परवानगी नसताना आणि अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन करून हा साठा साठवण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी मोहम्मद अलीम मोहम्मद युसूफ (वय ४६, रा. घुग्घुस) याच्याविरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरात छापा टाकला. गोपनीय कॅमेऱ्यांच्या मदतीने या गैरकायदेशीर साठवणुकीवर पाळत ठेवली जात होती. या छाप्यात पोलिसांनी २,८४,८४५ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिश्याचा अवैध साठा जप्त केला. पोलिसांनी मुख्य आरोपी सागर प्रमोदराव केकती (रा. आझाद चौक, सिंदेवाही) याला रंगेहात अटक केली असून पुढील कारवाईसाठी सिंदेवाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यातील मुख्य पुरवठादाराचा (सप्लायर) शोध सध्या पोलीस घेत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार आणि अंमलदार अजित शेडेंच्या पथकाने यशस्वी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *