LatestNewsगोंदियाविदर्भ

केसलवाडा येथे श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह

जगदीश (बालू) बावनथडे यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष रंगत

तिरोडा : तिरोडा तालुक्यातील केसलवाडा येथील श्री संत बह्या बाबा देवस्थानात श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या पावन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालू) बावनथडे यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात सकाळपासूनच देवस्थान परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा-अर्चा, अभिषेक व आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता, तसेच आकर्षक रोषणाईमुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.उत्सवाच्या निमित्ताने आयोजित भजन व कीर्तन कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. स्थानिक भजन मंडळांनी सादर केलेल्या अभंग आणि कीर्तनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले, तर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी देवस्थान परिसर दुमदुमून गेला होता. संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने ‘दहीकाला’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवकांनी उत्साहात सहभाग घेत दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला. या वेळी उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला आणि या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता अत्यंत उत्साहात झाली.या प्रसंगी जगदीश (बालू) बावनथडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच देवस्थानाच्या विकासकामांबाबत माहिती घेऊन आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना त्यांनी “श्री संत बह्या बाबांच्या पावन भूमीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करणे ही भाग्याची गोष्ट आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम समाजाला सकारात्मक दिशा देणारा आहे. अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा आणि सद्भावना वाढीस लागते,” अशा भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, तिरोडा पंचायत समितीचे सभापती तेजराम चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोड्याचे सभापती जितेंद्र (पिंटूभाऊ) रहांगडाले, संचालक रामसागर धावडे, ओमभाऊ पटले, घनश्याम पारधी, रविंद्र (बालाभाऊ) वहिले, सरपंच दिपक कुकडे, संजय किंदरले, उत्तम कुकडे, सुकळीचे सरपंच सुनील मेश्राम, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष हर्षवर्धन मेश्राम यांच्यासह गावातील अनेक मान्यवर नागरिक व भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत, केसलवाडा येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळा धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकात्मता आणि उत्साहाचा संगम ठरला असून ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *