LatestNewsगोंदियागोंदिया- भंडारामहाराष्ट्र

आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडली; पालकांमध्ये संभ्रम

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम; अर्ज सादरीकरणाची मुदत आता २८ मार्चपर्यंत वाढवली

गोंदिया : शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत सुरू असलेली शालेय प्रवेश प्रक्रिया यंदा वारंवार मुदतवाढीमुळे रखडल्याचे चित्र दिसून येत आहे. सुरुवातीला १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत १० मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे ही प्रक्रिया विस्कळीत झाली असून, प्रशासनाने पुन्हा एकदा मुदत वाढवत ती २८ मार्चपर्यंत नेली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च शासनाकडून संबंधित शाळांना दिला जातो. त्यामुळे दरवर्षी हजारो पालक आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होतात. यंदाही मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची शक्यता असताना, सततच्या मुदतवाढीमुळे प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.दरम्यान, राज्यातील शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून, त्याचा थेट परिणाम आरटीई प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. अनेक ठिकाणी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाल्याने अर्जांची छाननी, पडताळणी आणि लॉटरी प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्टता मिळत नाही. काही ठिकाणी पालकांना आवश्यक माहिती मिळण्यातही अडचणी येत आहेत.विशेष म्हणजे, प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर ‘तारीख पे तारीख’ अशी स्थिती निर्माण झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. अर्ज भरल्यानंतर पुढे काय होणार, लॉटरी कधी काढली जाणार, प्रवेशाची अंतिम यादी केव्हा जाहीर होणार याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने पालक त्रस्त झाले आहेत.शिक्षण मंडळाकडून २८ मार्चपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली असली, तरी त्यानंतरची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल का याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. प्रशासनाने लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढून आरटीई प्रवेश प्रक्रिया गतीमान करावी, तसेच पालकांना स्पष्ट आणि वेळेवर माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *