‘डिजिटल’ पॅटर्न; फत्तेपूरच्या विद्यार्थ्यांनी धरली संगणकाची कास
स्मार्ट शिक्षणाने वाढला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास : आयसीटी लॅबचा प्रभावी वापर
गोंदिया : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील अनेक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या असून, गोंदिया जिल्ह्यातील भानपूर केंद्रांतर्गत येणार्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फत्तेपूर येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे आधुनिक धडे दिले जात आहेत. येथील विद्यार्थी आता केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता संगणक, प्रोजेक्टर व इंटरनेटचा प्रभावी वापर करून विविध विषय अधिक आकर्षक व समजण्यास सुलभ पद्धतीने शिकत आहेत. या डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयीची ओढ कमालीची वाढली आहे.

आयसीटी लॅबमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याची सवय लागली असून, त्यांच्यातील डिजिटल कौशल्ये आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होत आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात आयसीटी शिक्षिका कु. एस. जे. बोपचे यांचे मोलाचे योगदान असून, त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच जिल्हा समन्वयक सुभाष चौरागडे यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला या लॅबचा अधिक प्रभावी वापर करता येत आहे.शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आय.ए.घरसेले, सहाय्यक शिक्षक टी.एस.बिसेन, आर.जी.नागपुरे, के.के.नाईक व टी.एल.कटरे यांनी शाळा डिजिटल बनविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे विद्यार्थी संगणकाचा उपयोग शिस्तबद्ध पद्धतीने करत आहेत. आयसीटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता आधुनिक शिक्षणाची समान संधी उपलब्ध झाली असून, शिक्षण प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, आयसीटी शिक्षक, जिल्हा व तालुका समन्वयक आणि समग्र शिक्षा अभियान यांच्या संयुक्त प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यात आय.सी.टी. लॅब यशस्वीपणे कार्यरत आहेत.

