LatestNewsगोंदियाविदर्भ

कोकणा/जमी.-गोंडउमरी मार्गाच्या दुरूस्तीचा विसर

खड्डेमय रस्ता रहदारीसाठी धोकादायक
जीव गेल्यावरच विभागाला लक्ष देणार का?
सडक अर्जुनी (भामा चुर्‍हे) :
तालुक्यात साबां विभाग आणि जनप्रतिनिधींचा अफलातून कारभार सुरू आहे. ज्या रस्त्याला दुरूस्ती किंवा डागडुजीची गरज नाही. त्याची दुरूस्ती करून निधीची उधळपट्टी केली जात आहे. तर दुरवस्थेला आलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष करून डोळेझाक केली जात आहे. असाच प्रकार कोकणा/जमी.-गोंडउमरी मार्गाच्या दुरूस्तीला घेवून सुरू आहे. मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे आजघडीला सदर रस्ता अत्यंत जर्जर आणि खड्डेमय झाला आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे. खड्डेमय रस्ता नागरिकांच्या जीवावर उठूनही याकडे संबधित विभाग आणि जनप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या जिवघेण्या अपघातानंतरच विभाग व जनप्रतिनिधींची झोप उघडणार काय? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेला कोकणा/जमी.-गोंडउमरी रस्ता दुरवस्थेला आला आहे. रस्त्याची चाळण झाली असून जर्जर रस्ता रहदारी करणार्‍यांच्या जीवावर उठला आहे. ५ ते ६ वर्षांपासून या रस्त्याच्या डागडुजी करण्याचे साधे औदार्य विभागातील अधिकारी व क्षेत्रातील जनप्रतिनिधीकडून दाखविण्यात आले नाही. यामुळे रस्ता दिवसेंदिवस खड्डेमय होत आहे. या मार्गावरुन रहदारी करणे कठीण होवून बसले आहे. परिणामी जीव मुठीत घेवून रहदारी करण्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही. खड्डे चुकविताना अपघात घडून येत आहेत. अनेक दुचाकी चालक खड्ड्यांमध्ये पडून जखमी होत आहेत. तर चारचाकी वाहन देखील अडकत असल्याने मोठी समस्या निर्माण होत असते.अशात परिस्थितीत विकासपुरूष म्हणून स्वत:ला मिरविणारे जनप्रतिनिधी गेले कुठे? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याची अवस्था बिकट होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने फक्त विकासाच्या नावावर मलई लाटण्याचे काम सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ज्या रस्त्याला डागडुजी व दुरूस्तीची गरज नाही, अशा रस्त्याची मलमपट्टी करून मालसुतो कार्यक्रम राबविला जात आहे. तर ज्या रस्त्याला दुरूस्तीची गरज आहे, त्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने शासनाच्या निधीने अधिकारी आपले खिसे गरम करीत आहेत, असा आरोप गावकर्‍यांकडून केला जात आहे.
……………
पडून असलेले मुरूमाचे ढिगारे कुणाचे?
चिखली जिल्हा परिषद क्षेत्रातील कोकणा/जमी.ते गोंडउमरी रस्ता दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच रस्ता दुरूस्तीसाठी कंत्राटदाराकडून भर पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्यात आला आहे. परंतु, दुरूस्तीला घेवून पाऊल उचलण्यातत आले नाही. यामुळे पडून असलेला मुरूम कुणाचा? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. कंत्राटदाराने दुरूस्तीच्या नावावर अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करून रस्त्याच्या कडेला टाकल्याची चर्चा परिसरात आहे. कोकणा/जमी.-गोंडउमरी रस्त्याच्या दुरूस्तीच्या नावावर लिपापोती करून खिसे गरम कार्यक्रम राबविण्याचा अधिकारी व कंत्राटदाराचा मनसुबा असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे रस्ता दुरूस्ती होते की लिपापोती? याकडे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *